सर्वात आधी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत झालेला वाद, त्यानंतर रवी शास्त्रींना प्रशिक्षक बनवण्यासाठी केलेलं लॉबिंग, शास्त्रींची निवड झाल्यानंतर मनासारखा सपोर्ट स्टाफ हवा म्हणून शास्त्रींचा हट्ट, या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसात सामान्य क्रीडा रसिक भारतीय क्रिकेटपटूंवर नाराज आहेत. ज्या पद्धतीने अनिल कुंबळेंना आपल्या पदावरुन जावं लागलं, ते अनेक भारतीय क्रीडा रसिक आणि माजी खेळाडूंना पटलेलं नाही. त्यातच कुंबळेंच्या कारकिर्दीत ड्रेसिंग रुममधल्या तणावाबद्दल अनेक वेळा माध्यमांमध्ये चर्चा झाल्या असून यावरुनही विराट कोहलीला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

मात्र या सर्व वादानंतरही विराट कोहली आपल्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी तितक्याच कणखरतेने सज्ज झालाय. पहिल्या कसोटी सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विराटने आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

“संघातल्या प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी समजली आहे. तरुण खेळाडूंनीही संघातल्या प्रत्येक खेळाडूशी जुळवून घेतलं आहे. ज्या खेळाडूंना संघात संधी मिळत नाहीये, त्यांचाही संघाला मदत करताना, त्यांच्यासाठी ड्रिंक्स आणतानाचा उत्साह बघितल्यावर तेही अंतिम ११ संघाचे सदस्य असल्याचच वाटतंय. त्यामुळे सध्या भारतीय ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं आहे हे तुम्हाला कळलं असेलच.” पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना विराट कोहली उत्तरं देत होता.
याव्यतिरीक्त प्रत्येक कठीण प्रसंगात संघ म्हणून आम्ही एकत्र निर्णय घेतोय. प्रत्येक खेळाडू एकमेकांची खेळण्याची शैली समजावून घेत त्यांच्यासोबत मिसळून गेलाय. त्यामुळे एक सांघिक कामगिरी करण्यासाठी या वातावरणाचा आम्हाला खूप फायदा होईल असं कोहली म्हणाला.

अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना कोहली आणि कुंबळे यांच्यातले संबंध ताणले गेल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. दोघांमध्ये चॅम्पियन्स करंडकादरम्यान संवादही होत नसल्याचं समोर आलं होतं. त्यातचं बीसीसीआयने विराट कोहलीच्या पसंतीच्या रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदावर नेमल्यामुळे, संघातल्या कुरबुरी थांबून मैदानात तो चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.