भारजाचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने शनिवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. अझरबैजान येथे सुरू असलेल्या शामकीर चषक बुद्धिबळ स्पध्रेत आनंदने स्थानिक खेळाडू शाखरीयार मामेद्यारोव्हचा पराभव केला आणि २८०० क्रमवारी गुणासह दुसरे स्थान गाठले.
ही स्पर्धा आनंदसाठी खडतर अशीच होती, परंतु जबरदस्त पुनरागमन करून त्याने सलग दोन विजयांसह ५.५ गुणांची कमाई करत स्पध्रेतही दुसरे स्थान निश्चित केले. विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला अमेरिकेच्या वेस्लेय सो याच्याविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. आठ डावांच्या या स्पध्रेत आनंदने अखेरच्या डावात त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही.
पांढऱ्या मोहऱ्याने खेळणाऱ्या आनंदने घोडय़ाची चाल करत मामेद्यारोव्हला बुचकळ्यात टाकले. मध्यंतरापर्यंत आनंदने आपले प्यादे पटावर चहू बाजूंना पसरवून डावात वर्चस्व गाजवले. आनंदने साध्या प्याद्यासाठी आपल्या हत्तीचा बळी देऊन प्रतिस्पर्धी खेळाडूवर आणखी दडपण निर्माण केले. या दडपणखाली मामेद्यारोव्ह पूर्णपणे कोसळला आणि ४७ चालीत त्याने पराभव पत्करला.