आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज व देविंदर हे वाल्मीकी बंधू, तसेच त्यांचा पुतण्या अनुप अमरपाल हे तिघेही आगामी हिरो हॉकी इंडिया लीगसाठी सज्ज झाले आहेत. हे तीनही खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचाईजीकडून खेळत आहेत.
युवराज हा गतविजेत्या दिल्ली वेव्हरायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे, तर देविंदर हा कलिंगा लान्सर्स संघाकडून खेळत आहे. नव्यानेच तयार झालेल्या दबंग मुंबई संघाच्या आक्रमणाची जबाबदारी अमरपाल याच्याकडे सोपविण्यात आली आहे.
युवराज या २३ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत हॉकी जागतिक लीग (२०१४), ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा (२०१२), चॅम्पियन्स चषक स्पर्धा (२०१२), सुलतान अझलान शाह चषक स्पर्धा (२०१२) व आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा (२०११) या स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्याने गतवेळी पाच गोल करीत दिल्ली संघास विजेतेपद मिळविण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
देविंदर याने गतवेळी कलिंगा संघाकडून खेळताना गोन्झालो पेईलात, लुकास व्हिला, किएल ब्राऊन, रियान अर्चीबाल्ड यांच्याबरोबर भाग घेतला. अमरपाल हा प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे.