युवराज सिंग…’बस नाम ही काफी हैं!…’ तब्बल १८ वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…सार्वजनिक जिवनात असो की क्रिकेटच्या मैदानावर, त्यानं हार कधी मानलीच नाही. मॅच विनर अशी त्याची खास ओळख. त्यानं आतापर्यंत अनेक अप्रतिम खेळी साकारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. पण त्याची एक ‘स्फोटक’ खेळी क्रिकेट चाहत्यांच्या कायम लक्षात राहील. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा खणखणीत षटकार खेचले होते. दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी त्यानं ही कमाल केली होती आणि क्रिकेटच्या पंढरीतील ‘सिंग इज किंग’ ठरला होता.

युवराजनं १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं टीम इंडियासाठी दिलेलं योगदान पुढील अनेक दशकं लक्षात राहील. त्यात त्यानं टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध केलेला विक्रम कायम स्मरणात राहील. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या १९ व्या षटकात त्यानं लागोपाठ सहा खणखणीत षटकार खेचले होते. त्याच्या एका षटकातच ३६ धावा वसूल केल्या होत्या. टी-२० कारकिर्दीतील त्याची ही विक्रमी खेळी ठरली. अवघ्या १२ चेंडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावलं होतं.

भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीच्या जोडीनं डावाची आक्रमक सुरुवात केली. सेहवागनं ६८ तर गंभीरनं ५८ धावा केल्या. अवघ्या १४ षटकांत या दोघांनी १३६ धावांची भागिदारी केली. टीम इंडियाला चांगली सुरुवात झाल्यानं उरलेल्या सहा षटकांत मोठी धावसंख्या उभारायच्या निश्चयानं महेंद्रसिंग धोनी आणि युवराज मैदानात उतरले. त्यानुसार युवराजनं अपेक्षित सुरुवात केली. ब्रॉडच्या १९ व्या षटकात त्यानं ‘जलवा’ दाखवलाच! पहिल्याच चेंडूवर त्यानं मिडविकेटला उत्तुंग षटकार ठोकला. दुसरा चेंडू फ्लिक करून दुसरा षटकार खेचला. लागोपाठ दोन षटकार तडकावल्यानं ब्रॉडची लय बिघडली. त्यानं तिसरा चेंडू ऑफ साईडला टाकला. त्यावरही युवराजनं षटकार लगावला. ब्रॉडनं चौथा चेंडू हाय-फुलटॉस टाकला, पण युवराजच्या तळपणाऱ्या बॅटीतून तोही सीमापार गेला. सलग चौथा षटकार मारल्यानं ब्रॉड पार खचून गेला होता. अखेर त्यानं ओव्हर द विकेट चेंडू टाकण्याचं ठरवलं. पण मैदानावरच्या या वाघानं शेवटच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारले आणि टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.