भारतीय रग्बी फुटबॉल संघटनेचे महाव्यवस्थापक नासेर हुसेन यांची माहिती; १५ खेळाडूंचा समावेश

‘भारतात रग्बी या खेळाचे वाढते आकर्षण लक्षात घेता ७ खेळाडूंच्या स्पध्रेप्रमाणे आगामी काळात महिलांच्या १५ खेळाडूंच्या अजिंक्यपद स्पध्रेचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय रग्बी संघटनेचे महाव्यवस्थापक व भारतीय पुरुष रग्बी संघाचे कर्णधार नासेर हुसेन यांनी दिली.

भारतीय रग्बी फुटबॉल संघटना आणि प्रायोजकांचा गुरुवारी तीन वर्षांचा करार झाला. त्यानंतर मुंबईत आयोजित कार्यक्रमात या गोष्टीची घोषणा करण्यात आली. सोसाएटे जनराल भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रायोजक असणार आहेत. हुसेन यांच्यासह संघटनेचे सरचिटणीस महेश मथाय, सोसाएटे जनरालच्या एव्हलीन कॉलीन, आशियाई रग्बी संघटनेचे उपाध्यक्ष आगा हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भारतातील रग्बी खेळाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्यात आला. ‘कोलकाता आणि मुंबई या शहरांपर्यंत मर्यादित असलेला हा खेळ आज जवळपास २४ राज्यांपर्यंत पोहोचला आहे. ५५ हजाराहून अधिक पुरुष व मुले या खेळाकडे वळली आहेत. २००८ सालापासून महिलांच्या स्पध्रेला सुरुवात करण्यात आली आणि आठ वर्षांत २० हजार महिला खेळाडूंनी रग्बी खेळायला सुरुवात केली,’ अशी माहिती मथाय यांनी दिली.

या खेळाला आर्थिक पाठबळ मिळाले, तर पुढील पाच वर्षांत भारतीय संघ आशियाई देशांमध्ये १२ वरून अव्वल पाच संघात स्थान पटकावेल, असा विश्वास आगा हुसेन यांनी व्यक्त केला.