सोमदेव देववर्मनला दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत युकी भांब्रीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
एकतर्फी झालेल्या उपांत्य लढतीत सोमदेवने बेल्जियमच्या किमेर कोप्पजान्सवर ६-३, ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये किमेरने सुरुवातीला सोमदेवला चांगली लढत दिली, मात्र सोमदेवच्या आक्रमक खेळापुढे त्याचा बचाव निष्प्रभ ठरला. हा सामना त्याने एक तास पाच मिनिटांमध्ये जिंकला. युकीला मात्र उपांत्य फेरीत विजय मिळविण्यासाठी चिवट झुंज द्यावी लागली. त्याने बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सवर ४-६, ६-४, ७-५ असा निसटता विजय नोंदविला. पहिल्या सेटमध्ये युकीला एका गेममध्ये सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे त्याला हा सेट गमवावा लागला, मात्र नंतरच्या दोन्ही सेट्समध्ये त्याने दमदार सव्‍‌र्हिस व परतीचे फटके लगावत विजय मिळवला.