भारताचा डावखुरा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन केले असले तरी त्याला आयपीएलमध्ये धक्का बसला आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने त्याला संघात कायम न ठेवता हस्तांतरणासाठी उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाने भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही लिलावासाठी उपलब्ध केले आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची मालकी असलेल्या जीएमआर कंपनीने युवराजला १६ कोटी रुपये मोजत संघात स्थान दिले होते. पण युवराजला १४ सामन्यांमध्ये फक्त २४८ धावाच करता आल्या होत्या. त्याच्या या सुमार कामगिरीमुळेच त्याला संघाने कायम ठेवलेले नसल्याचे समजते.
दरम्यान, भारताचा फलंदाज केदार जाधव या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत होता. ‘‘केदार जाधव या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणार आहे,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या पत्रकात दिली आहे.