तुम्हाला फेसबुक सतत वापरायची, त्यावरील अपडेट बघण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. फेसबुकमुळे तुमच्या मेंदूतील विविध रासायनिक समतोल बिघडण्याची शक्यता असते. समाजमाध्यमांवर सक्रिय असण्याचे प्रमाण जास्त असल्यास मेंदूच्या प्रणालीतही बिघाड होण्याची शक्यता तितकीच वाढते.

याबाबत तज्ज्ञांनी ३४१ विद्यार्थ्यांवर संशोधन केले. त्यांनी पहिल्या अभ्यासक्रमाच्या सत्रात फेसबुक जास्त वापरणाऱ्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांवर पुढील वर्षांच्या परीक्षेपर्यंत लक्ष ठेवले. संशोधनाअंती ज्या मुलांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या मुलांमध्ये भावनिकदृष्टय़ा असमतोलपणा असल्याचे आढळले. तज्ज्ञांच्या मते ७६ टक्केविद्यार्थी वर्गामध्ये अभ्यास शिकवत असताना फेसबुक वापरायचे आणि ४० टक्के वर्गाबाहेर फेसबुकचा वापर करायचे. ६३ टक्के एकमेकांशी समोरासमोर बोलताना फेसबुकचा वापर करायचे तर ६५ टक्के कोणतेही काम करताना कामे सोडून फेसबुकचा वापर करीत होते. या मुलांमध्ये समाजमाध्यमांच्या वापराचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला. तज्ज्ञांच्या अभ्यासानंतरच्या वर्षीही या मुलांमध्ये गुणवत्ता घसरण्याचे प्रमाण कायम होते.