ज्या लोकांच्या मनात दिवस-रात्र नकारात्मक विचार येतात ते सतत चिडचिड करतात त्यांना तो त्रास मानसिक ताणामुळे होत असतो असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. युवर दोस्त या ऑनलाइन काऊन्सेलिंग अ‍ॅण्ड इमोशनल वेलनेस पोर्टलने हा अभ्यास केला असून त्यांच्या मते सतत नकारात्मक विचार करणे हे मानसिक ताणाचे लक्षण आहे. ताण ही मानसिक समस्या असून त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करीत असतो व त्यातील पन्नास टक्के रुग्णांत चिडचिडेपणा दिसून येत असतो. त्यांच्यात निराशावादी विचारही मनात ठाण मांडू बसतात व ते पाठ सोडत नाहीत, असे होत असेल तर तुम्हाला मानसिक ताण जास्त आहे असे समजायला हरकत नाही. अनियमित खाणे-पिणे, अनियमित झोप यामुळेही असे होऊ शकते. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ४१ टक्के लोकांनी म्हटल्यानुसार त्यांचे खाणे-पिणे व झोपेच्या सवयी बदलल्या तेव्हा त्यांना ताण आला. ३९ टक्के लोकांच्या मते संयमातील बदलाने ताण येतो. ३६ टक्के लोकांची कामातील उत्पादकता सततच्या नकारात्मक विचारांनी कमी झाली व स्वत:वरच टीका करण्याचे प्रमाण ३५ टक्के  लोकांमध्ये जास्त होते. बदलती जीवनशैली हे ताणाचे प्रमुख कारण आहे असे मनोविश्लेषक श्रुती सिंघल यांनी सांगितले. त्यांच्या मते, काही व्यक्तींचे साहचर्य हे अनुकूल नसते, शिवाय बाहेरची परिस्थितीही मानसिकतेवर परिणाम करते त्यामुळे ताण वाढतो.. जीवनाच्या प्रत्येक स्तरातील लोकांमध्ये ताण वाढत आहे, कारण स्पर्धात्मकता वाढली असून व्यावसायिक तसेच जीवनशैलीचा ताण असह्य़ होत आहे. सामाजिक व कौटुंबिक वीण उसवत चालल्याने एकटेपणा वाढत आहे, भावनिक कोंडमारा यामुळेही ताण वाढत आहे.

भारतातील १४ टक्के लोक अतिताणाखाली जगत आहेत. ५८ टक्के लोक मानसिक समुपदेशकांची मदत घेत आहेत, तर सहा टक्के लोक मनोविकारतज्ज्ञांकडे जातात. उर्वरित ५२ टक्के लोक संगीत व झोपेचा वापर ताण कमी करण्यासाठी करतात. आपल्या देशात पुरुषांपेक्षा महिला जास्त ताणाखाली आहेत, तर विवाहितांपेक्षा एकटे स्त्री-पुरुष ताणांचे नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतात.