अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर आता मोबाईल आणि वायफाय ही देखील अनेकांची प्राथमिक गरज बनत चालली आहे. काहींना मोबाईलचं इतकं वेड असतं की एकवेळ सगळं काही विसरतील पण मोबाईल विसणार नाहीत. या लोकांच्या जेवताना, झोपताना सतत मोबाईल जवळ असतोच. काहीजण तर अगदी टॉयलेटमध्येही मोबाईल सोबत घेऊन जातात. आता अशा ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील, पण तुम्हाला अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा!

कोणत्याही जागेपेक्षा टॉयलेटमध्ये अधिक जीवजंतू असतात. आपण जेव्हा मोबाईल या ठिकाणी नेतो तेव्हा हे जंतू मोबाईलवर चिकटतात. टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर आपण हात स्वच्छ धुतो पण मोबाईल धुणं किंवा स्वच्छ करणं शक्य नसतं. तेव्हा हे सूक्ष्म जंतू मोबाईलवरच चिटकून राहतात.  काहीजणांचा मोबाईल अनेकदा गरम होतो. हे तापमान जंतूच्या वाढीसाठी पोषक असतं. तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा मागील बाजूस ठराविक तापमानास या सूक्ष्म जंतूची वाढ होत जाते. हे  जंतू उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही.  आपण शंभरवेळा हातात मोबाईल घेतो आणि त्याच हातनं जेवतो.  तेव्हा  हे जंतू पोटात जाऊन आपण आजारी पडण्याची शक्यताही असते. तेव्हा तुम्हालाही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर ती वेळीच बदला.