स्वाइन फ्लूच्या लक्षणांमध्ये सर्दी, ताप तसेच छातीत दुखण्याबरोबरच अता अतिसाराचे नवीन लक्षण उद्भवू लागल्यामुळे आरोग्य विभागाने सर्दी व तापाबरोबर अतिसाराचा त्रास होणाऱ्या रुग्णांनाही स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण म्हणून तपासण्याचे आदेश जारी केले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून गेल्या साडेचार महिन्यांत १८९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर श्वसनमार्गाच्या तक्रारी प्रामुख्याने दिसून येतात. तथापि या वर्षी पुण्यामधून अतिसार, हगवणीच्या तक्रारीही मोठय़ा प्रमाणात आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाने राज्यात सतर्कतेचा इशारा देताना अतिसार व हगणवण झालेल्या रुग्णांकडेही स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या पाहणीत पचनसंस्थांशी संबंधित विकारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. स्वाइन फ्लूच्या या बदलत्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. हवेतून तसेच स्पर्शातून हा आजार होऊ शकतो तसेच स्वाइनचा विषाणू शरीरात सर्वत्र संचार करतो. तथापि सर्वाधिक संसर्ग हा श्वसनमार्गावर होत असल्याने रुग्णाला श्वसनाचा त्रास प्रामुख्याने उद्भवतो. यंदा पचनसंस्था व आतडय़ाच्या कार्यावरही या विषाणूचा परिणाम होत असल्याचे दिसून आल्यामुळे खासगी डॉक्टरांनाही योग्य ती काळजी घेण्यास सांगण्यात आल्याचे डॉ. पवार म्हणाले.

१८९ जणांचा मृत्यू

१ जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे ३०९१ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. त्यांपैकी ९५६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले, तर १८९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वाइन फ्लूची लागण मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून आल्यामुळे खासगी डॉक्टर्स, तसेच ‘आयएमए’च्या माध्यमातून संशयित रुग्ण आढळल्यास पहिल्या अठ्ठेचाळीस तासांत टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यास सांगण्यात आले आहे.