जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी. श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष..  ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे  ‘‘जंगलच्या राजा’’चे साम्राज्य. तांबडय़ा मातीवरून चालताना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही. आपली नजर सतत शोध घेत असते पाणवठय़ावर जाणवणाऱ्या हालचालीचा. हा कानोसा घेत असतानाच वाघोबांचे दर्शन झाले तर अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि थरार बरंच काही सांगून जातो.

येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव मिळाले. तर अंधारी वन्यजीव अभयारण्याला या अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या अंधारी नदीवरून नाव देण्यात आले. ताडोबा आणि अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

येथील जंगल हे प्रामुख्याने कोरडय़ा पानगळीचे आहे. हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते.

वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे. पट्टेवाला वाघ हे या जंगलाचे वैशिष्टय.अत्यंत रुबाबदार  असलेल्या बिबळ्याचे दर्शन ही येथे सहजगत्या होते.

निवास व्यवस्था : मोहर्ली आणि कोलारा येथे वन विकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल  आहे. आरक्षणासाठी (www.fdcm.nic.in) वर संपर्क करावा. याशिवाय मोहर्ली येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचेही पर्यटन संकुल आहे. आरक्षणासाठी  (www.maharashtratourism.gov.in)  संपर्क करावा. मोहर्ली आणि कोलारा येथे खाजगी पर्यटक निवासही उपलब्ध आहेत.

 प्रवेश : मुख्य प्रवेश मोहर्ली येथून आहे. त्याशिवाय कोलारा, झरी आणि पांगडी येथूनही प्रवेश दिला जातो.

कसे पोहोचाल : हवाईमार्गे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर १५५ कि.मी

 रेल्वे :  चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य मार्ग) ४५ कि.मी,

रस्ता :  चंद्रपूर- ४५ कि.मी,

चिमूर- ३२ कि.मी.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurkhe.mulay@gmail.com