अजिंठा लेणींचा अभ्यास करता करता भारतीय इतिहासाचे आयाम बदलून टाकणाऱ्या डॉ. वॉल्टर स्पिंक या अमेरिकी संशोधकाची खास मुलाखत-

प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक असे शब्द उच्चारले तरी जगभरातील अनेक तज्ज्ञांच्या डोक्यात अजिंठा आणि वेरुळच्या लेणींचे चित्र उमटते.. म्हणूनच तर कदाचित विकीपीडियालाही अजिंठा- वेरुळची नोंद करताना चौथ्या- पाचव्या ओळीमध्येच वॉल्टर स्पिंक यांची व त्यांच्या अतिमहत्त्वाच्या ठरलेल्या संशोधनाची दखल घ्यावी लागते.
गेली ६० वर्षे हा ८६ वर्षांचा अमेरिकन संशोधक अजिंठय़ाशी एवढा एकरूप झाला आहे की, अजिंठा परिसरातील कोणत्याही एका रेस्तरांमध्ये चक्क लुंगीवर फ्रंक सिनात्राचे गाणे ऐकत- गात त्यावर नाचतानाही नजरेस पडू शकतो. भारतावर प्रेम करणारी किंवा आपण भारताच्या जवळचे आहोत, असे भासवणारी अमेरिकन मंडळी इथे आल्यावर आपल्यालाच भारतीय भाषेत नमस्कार असे शब्द उच्चारून चकित करतात. पण गेली ६० वर्षे सातत्याने महाराष्ट्रात येणारे वॉल्टर स्पिंक आपल्याला दोन- तीन मराठी वाक्यं आणि अनेक मराठी शब्द सहज ऐकवून जातात. आताशा त्यांना मराठीही कळू लागले आहे. मांसाहारी असलेले स्पिंक गप्पांच्या ओघात म्हणतात, मी युनायटेड चिकन्स ऑफ महाराष्ट्राचा संस्थापक आहे. म्हणूनच तर अजिंठय़ाच्या ५०० किलोमीटर्स परिसरात तुम्हाला एकही कोंबडी सापडणार नाही, कारण ती मीच फस्त केलेली असते.. आता वयोमानानुसार काहीसे बारीक झालेले डोळे हे सांगताना मिश्कील मिचकावतातही. आपण मांसाहारी असल्याचा त्यांना कोण अभिमान.
१६ फेब्रुवारी १९२८ रोजी अमेरिकेत जन्मलेले वॉल्टर स्पिंक तीन भावंडांमध्ये बरोबर मधले. सध्या बोस्टन शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणावर पर्यवेक्षक अभियंता म्हणून त्यांच्या वडिलांनी काम पाहिले. याच धरण प्रकल्पामुळे त्यांनाही बाजूच्या लहानशा गावातून विस्थापित व्हावे लागले. तेव्हा शाळेत असलेल्या वॉल्टरला त्या विस्थापित होण्याचा आणि नंतर शहरी जीवन जगण्याचा तसा त्रासच झाला आणि मग त्या त्रासाला कवितेच्या रूपाने शब्दरूपही मिळाले. ती वॉल्टर स्पिंक यांनी त्यांच्या आयुष्यात लिहिलेली पहिली कविता. त्या कवितेचे गावातही कौतुक झाले. आज ८६ व्या वर्षीही ते कविता करतात. जगभरात कुठेही गेले तरी कवितेचे पुस्तक सोबत असतेच असते.
आजवरचे त्यांचे जीवन हे अनेक कलाटण्यांनी समृद्ध झाले आहे. आयुष्याला कलाटणी मिळाली की, अनेकदा माणूस अस्वस्थ होतो पण स्पिंक म्हणतात, आयुष्यात अस्वस्थतेने टोक गाठले की, कलाटणी आपोआप मिळते. स्वत:च्या जीवनाचे असे एक वेगळेच तत्त्वज्ञान असणाऱ्या स्पिंक यांनी आता भारतीय इतिहासाला एक कलाटणी देणारे संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन म्हणजे भारतीय इतिहासावरचा नवा प्रकाशझोतच आहे. त्यामुळे आता भारतीय इतिहासाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय इतिहासामध्ये एक प्रश्न गाळलेल्या जागा भरण्यासाठी किंवा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी अवश्य विचारला जातो; तो म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ कोणता? डोळे झाकून आपण पाठ केलेले उत्तर त्या वेळेस लिहिलेले असते ते म्हणजे गुप्त राजवंशाचा कालखंड. मात्र आता वॉल्टर स्पिंक यांनी केलेल्या संशोधनानंतर भविष्यात भारतीय इतिहासात बदल झाले आणि या प्रश्नाचे उत्तर बदलून त्या जागी वाकाटक राजवंशाचा कालखंड असे उत्तर आले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
भारतीय इतिहासाला अशा प्रकारे नवीन कलाटणी देणाऱ्या या जगद्विख्यात संशोधकाचा प्रवास जीवशास्त्रापासून सुरू झाला आणि तो आता अजिंठा- वेरुळ, घारापुरी लेणींपर्यंत पोहोचला आहे. सध्या ते मिशिगन विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शोधनिबंधांची एक मालिकाच त्यांच्या नावावर आहे. गेली २० वर्षे ते अजिंठय़ामध्येच ना नफा, ना तोटा तत्त्वावर या विषयातील अभ्यासकांसाठी एक शैक्षणिक कार्यशाळा घेतात. हा रोचक प्रवास आणि इतिहासाला कलाटणी देणारे त्यांचे संशोधन हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विख्यात संशोधनानिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये बहि:शाल शिक्षण विभागांतर्गत नव्याने सुरू झालेल्या सेंटर फॉर आर्किऑलॉजीतर्फे महाराष्ट्रातील पुरातत्त्व विज्ञान या विषयांतर्गत महाराष्ट्रातील लेणी या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या गौरवार्थ करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठ वगळता कोरिया, जपान, चीन, अमेरिका आदी देशांतील अनेक मान्यवर विद्यापीठांनी आजवर प्रा. स्पिंक यांच्या गौरवार्थ अनेक परिसंवाद, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन यापूर्वी केले आहे. मुंबईत पार पडलेल्या या परिसंवादानिमित्ताने प्रा. स्पिंक अलीकडेच मुंबईत येऊन गेले. त्या वेळेस त्यांच्या संशोधनासंदर्भात त्यांनी ‘लोकप्रभा’ला दिलेली ही विशेष मुलाखत –
४ अजिंठय़ावरील या संशोधनाला सुरुवात केव्हा व कशी झाली?
– खरेतर महाविद्यलयात असताना मी जीवशास्त्राचा विद्यार्थी होतो. मला प्राणी अतिशय आवडायचे. शाळेत असतानाच मला अमेरिकेतील प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालयात काम मिळाले. महाविद्यालयात पहिल्या वर्षांला असतानाच लक्षात आले की, प्राण्यांवर प्रेम असणे वेगळे आणि अभ्यास वेगळा. तिथे महाविद्यालयात प्रयोगशाळा, प्राण्यांची चिरफाड असे सारे काही करावे लागत होते. मग अखेरीस जीवशास्त्राला रामराम ठोकला आणि आर्ट हिस्ट्री अर्थात कलेतिहास या विषयासाठी दुसरे महाविद्यालय गाठले.
४ युरोपिअन किंवा पाश्चत्त्य कलेतिहासाकडून मग भारताकडे वळण्याचे कारण नेमके काय होते?
– १९४९ साली मी हॉवर्ड विद्यापीठात पी.एचडी.साठी प्रवेश घेतला. तिथे बेंजामिन रोलँड यांच्याशी भेट झाली, ते भारतीय कला या विषयातील तज्ज्ञ होते. ओरिसा येथील लिंगराज मंदिरावर संशोधन सादरीकरण करण्यासाठी म्हणून पत्नीसह भुवनेश्वरला पोहोचलो १९५२ साली. इथे पोहोचलो त्या वेळेस कल्पना नव्हती की, येथील मंदिरांमध्ये विदेशी व्यक्तींना प्रवेशबंदी होती. दुसऱ्या दिवशी चक्क धोतर नेसून पोहोचलो तेव्हाही प्रवेश नाकारण्यात आला. कारण कपडे बदलून काही मी भारतीय झालो नव्हतो. अखेरीस मी सादरीकरणाचा विषय बदलला. आता जिथे आपल्याला प्रवेशबंदी होणार नाही, असा विषय निवडण्याचे ठरवले. मग मी व पत्नी दोघांनाही लक्षात आले की, भारताला दगडामध्ये खोदलेल्या लेणींची समृद्ध परंपरा आहे. त्या लेणींमध्ये कुणालाही प्रवेशबंदी नाही. मग अखेरीस दोघेही खंदगिरी- उदयगिरी या जैन लेणींकडे पोहोचलो. तिथे संशोधन करताना लक्षात आले की, त्या लेणींचा कालखंड निश्चित करताना काहीतरी घोटाळा झाला होता, निश्चित केलेल्या कालखंडापूर्वीची अशी ती लेणी होती. मग अखेरीस त्यावरच सादरीकरण केले. मग लेणींचे वेडच लागले आणि हे वेड अजिंठय़ापर्यंत आम्हाला घेऊन आले.
४ लेणींच्या कालखंड निश्चितीचे तेव्हापासून लागलेले हेच वेड मग नंतर अजिंठय़ाचा कालखंडही बदलण्यापर्यंत पोहोचले..
– अजिंठय़ाचे झाले असे की, जेव्हा आयुष्यात इथे प्रथम पोहोचलो तेव्हाच या लेणींशी आपले काही जुने नाते असावे, असे वाटले. कारण माहीत नव्हते. खरे तर अजिंठा असे म्हटले की, लोकांना येथील जगप्रसिद्ध चित्रांची आठवण येते. अर्थात ही सारी चित्रे जगभरातील कुणीही प्रेमात पडावे, अशीच आहेत. पण माझे लक्ष मात्र सर्वप्रथम गेले ते येथील रचनेकडे. म्हणजे तेथे लेणींमध्ये खोदण्यात आलेले विहार, चैत्य यांच्या रचनेकडे. ती रचना पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालू लागले. त्यावर मग मी काम सुरू केले. मला त्या चित्रांपेक्षाही लेणींमधील दरवाजांच्या चौकटी, त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण रचना याच अधिक खुणावत होत्या. त्या सातत्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताहेत, असे सतत वाटत होते.
४ लेणीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वाटण्यातूनच मग तुमच्या ‘कलेतिहासाला असलेले मानवी अंग’ या प्रसिद्ध सिद्धान्ताचा जन्म झाला का?
– हो, तसे म्हणू शकता हवे तर. गेली सुमारे ६० वर्षे मी भारतीय कलेवर संशोधन करतो आहे. त्यातही खासकरून अजिंठय़ावर. माझ्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, येथील रचना नीट पाहिली. तिचा व्यवस्थित अभ्यास केला तर कालखंड निश्चितीसाठी तिचा फायदाच होतो. कारण ती रचना सुरुवातीस कशी होती. मग कोणती व कशी गरज निर्माण झाली. मग ती गरज भागविण्यासाठी त्या उपलब्ध वास्तूमध्ये कसे बदल करण्यात आले, या सर्व गोष्टी आपल्याला सहज कळत जातात. खासकरून लेणींमध्ये तर हे सहज लक्षात येते, कारण एखादी रचना ही लेणी खोदतानाच कलावंत किंवा वास्तुशिल्पीच्या मनात किंवा आरेखनात असेल तर ती लेणीमध्ये भिंतीच्या पुढे असलेल्या रचनेत पाहायला मिळते. आणि ती नंतरच्या कालखंडातील रचना असेल तर ती दगडी भिंतीच्या आतमध्ये खोदलेली दिसते. कोणते शिल्प हे भिंतीच्या पातळीच्या बाहेर आणि कोणते आत यावरून कोणती रचना आधीची व कोणती नंतर हे सहज सांगितले जाऊ शकते.
४ पण मग त्यावरून कालखंड निश्चिती कशी काय करणार? कालखंड निश्चित करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात?
– कालखंड निश्चित करताना या लेणींमध्ये असलेले शिलालेख आपल्याला मदत करतात. काही शिलालेखांमध्ये लेणी खोदलेल्या वर्षांचा थेट उल्लेख असतो. तर काही ठिकाणी हा उल्लेख अप्रत्यक्षपणे आलेला असतो. म्हणजेच अजिंठय़ाच्या बाबतीत बोलायचे तर हिरशेण राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी असा उल्लेख एका ठिकाणी आहे. राजाचा राज्याभिषेक केव्हा झाला, त्याचे वर्ष काढले की, लेणीच्या खोदकामाचे वर्ष सहज कळू शकते. दरखेपेस त्या त्या ठिकाणी असलेले शिलालेखच तुम्हाला मदत करतात, असेही नाही. इतरत्र असलेल्या शिलालेखांमधील संदर्भही अनेकदा मदत करतात. त्याशिवाय काही वेळेस तुम्हाला लिखित स्वरूपातील काही नोंदीही मदतीच्या ठरतात.
४ अजिंठाची कालनिश्चिती तुम्ही इसवी सन ४६२ ते ४७७ अशी केली आहे. हे करताना कोणते पुरावे ग्रा धरले, त्यांची मदत कशी काय झाली?
– डॉ. वासुदेव विष्णू मिराशी या विद्वान प्राध्यापकांनी भारतीय शिलालेखांच्या संदर्भात प्रचंड महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी विविध लेणींमधील विविध भाषा आणि लिपींमधील शिलालेख वाचले व त्यांचे अर्थही लावले. त्यांनी केलेले ते अतिमहत्त्वपूर्ण काम भारत सरकारच्या आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने प्रकाशित केले आहे. हे काम आजही प्रमाण मानले जाते. त्या कामानुसार अजिंठय़ाचा कालखंड पाचवे ते सातवे शतक असा दोनशे वर्षांचा समजण्यात आला होता. अजिंठय़ावर काम करत असतानाच मला अजिंठय़ापासून १८ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या घटोत्कच लेणी पाहण्याची संधी मिळाली. तेथील एक शिलालेख पाहून मला अनेक प्रश्न पडले, माझेही डोळे उघडले. मग मी अजिंठय़ाला परत आलो. तेथील शिलालेख व अजिंठय़ाशी, तेथील संबंधित राजघराण्यांशी संबंधित सर्व शिलालेख पुन्हा नव्याने, माझ्या डोक्यातील नव्या संदर्भासह वाचले. उपलब्ध असलेल्या दंडिनच्या दशकुमारचरित्रमधील नोंदींशी त्या ताडून पाहिल्या तेव्हा माझ्या डोक्यात असलेला कालखंड मांडण्याइतके पुरावे माझ्याकडे असल्याचे लक्षात आले. लेणींमधील शिलालेखातील संदर्भ, दशकुमारचरित्रमधील संदर्भ सारे काही एकत्र जुळले आणि अशा प्रकारे मी अजिंठय़ाचा कालखंड इसवी सन ४६२ ते ४७७ आहे, हे निश्चित केले. त्या संदर्भानुसार ज्या राजा हरिषेणाच्या कालखंडात अजिंठय़ाचे सर्वाधिक महत्त्वाचे काम करण्यात आले त्याचा राज्याभिषेक इसवी सन ४६०मध्ये झाला होता. त्यामुळे शिलालेखांतील संदर्भानुसार मग हा कालखंड इसवी सन ४६२ला नेमका जुळतो.
४ अजिंठाचा इतिहासही तेवढाच रोचक असल्याचे आपण नेहमी सांगता, त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासातील हाच तो सुवर्णकालखंड असल्याचे मतही आपण संशोधनातून सातत्याने मांडत आला आहात, त्यामागची कारणे काय आहेत?

– अजिंठा हे जगातील एक विलक्षण ठिकाण आहे, असे मला नेहमीच वाटत आले. केवळ मला वाटते म्हणून नाही तर उपलब्ध पुराव्यांनुसार इथला इतिहास तपासून पाहिला तर हे कुणाच्याही लक्षात येईल. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात इथे खोदकामाला सुरुवात झाली. येथील लेणींचे दोन कालखंडात विभाजन करता येते. त्यानंतरचे महत्त्वाचे काम हे पाचव्या शतकात त्यातही पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच हरिशेण राजाच्या कालखंडात झाले आहे. हरिषेणाचा पंतप्रधान वराहदेव याचा शिलालेख इथे कोरलेला आहे. या लेणी विलक्षण आहेत असे म्हणण्याचे कारण म्हणजे एकाच वेळेस इथे अश्मक, स्वत: वराहदेव आणि स्थानिक राजा उपेंद्रगुप्त यांचे लेणींचे खोदकाम सुरू होते. उपेंद्रगुप्त व अश्मक हे हरिषेणाचे मांडलिक राजे होते. सुरुवातीस सुरू असलेले अश्मकांचे लेणींचे खोदकाम हे उपेंद्रगुप्ताने थांबवले आणि त्याने अश्मकांना हाकलून लावले. लेणींचे महत्त्व सर्वाधिक वाटल्यानेच त्या वेळेस सत्ताप्रबळ असलेल्या उपेंद्रगुप्त आणि हरिषेणाचा पंतप्रधान असलेल्या वराहदेव याने स्वत: खोदण्याच्या लेणींसाठी बरोबर मधला भाग निवडला. त्यामुळे दोघांचीही लेणी बरोबर अजिंठय़ाच्या मध्यभागी नेमक्या ठिकाणावर आहेत. मात्र नंतर अश्मकांनी छुप्या पद्धतीने हरिषेणाच्या दरबारामध्ये आपली माणसे पद्धतशीरपणे घुसवली. त्यात हेरांचाही समावेश होता आणि मग त्यांनीच हरिषेणाची हत्या घडवली, असे दिसते. कारण ४७७ साली हरिषेणाचा मृत्यू अचानक झालेला दिसतो. तो अपघाती मृत्यूच होता. त्याची हत्याच झालेली असावी, असे ऐतिहासिक उपलब्ध पुराव्यांवरून लक्षात येते. कारण इसवी सन ४७८ नंतरचे इथे काहीच सापडत नाही. हरिषेणाच्या मृत्यूनंतर अजिंठय़ालाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासालाच कलाटणी मिळाली. आणि भारताच्या इतिहासातील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली. हरिषेणा बरोबरच वाकाटक राजवंशाची सत्ता संपुष्टात आली. त्याचबरोबरच अजिंठय़ाच्या वैभवात भर पडण्याची शक्यताही संपुष्टात आली.
४ वाकाटकांचा सर्वोत्तम राजा असलेल्या हरिषेणावर भारतीय इतिहास संशोधकांनी अन्यायच केल्याचा आरोप आपण सातत्याने करत आहात..
– खरेच आहे ते भारतीय इतिहास संशोधकांनी वाकाटक राजघराण्यावर आणि हरिषेणावर अन्यायच केला आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी तर गुप्त कालखंडानंतर आलेल्या वाकाटकांची आणि हरिषेणाची योग्य दखलही घेतलेली नाही. त्याला अनुल्लेखानेच मारले आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. ज्याला भारतीय इतिहास संशोधक गुप्तोत्तर कालखंड म्हणतात तो खरेतर वाकाटकांचा कालखंड होता. उपलब्ध लेखी नोंदी आणि शिलालेखांमधील संदर्भच पुराव्यादाखल पाहायचे तर संपूर्ण मध्य भारतावर त्या वेळेस वाकाटकांचे राज्य होते. त्यांच्या दोन शाखा होत्या. त्या हरिषेणाच्याच कालखंडात एकत्र आल्या व वाकाटकांचा एकछत्री अंमल सुरू झाला. तत्कालीन वत्सगुल्म आणि आजचे वाशीम ही त्यांची राजधानी होती. पश्चिम किनारपट्टीपासून ते पूर्व किनारपट्टीच्या बंगालपर्यंत त्यांचे राज्य पसरलेले होते. त्यात त्यात पश्चिम विदर्भ, अनुप, ऋषिक म्हणजे सध्याचा अजिंठय़ाचा परिसर समाविष्ट असलेले राज्य, अश्मक ज्यांचे राज्य औरंगाबाद परिसरावर होते, मध्य प्रदेशाचा माळव्याचा प्रांत आणि ओरिसा, बंगालचा परिसर, गुजरातेतील बहुतांश भाग, आंध्र देश असे वाकाटकांचे राज्य पसरलेले होते. संपूर्ण मध्य भारत महाराष्ट्रासह ज्यांच्या ताब्यात होता. एकीकडे उत्तर प्रदेशपासून ते खाली दक्षिणेतील आंध्र प्रदेशापर्यंत त्यांची सत्ता होती. महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल अशी व्याप्ती होती, त्या राजवंशाकडे भारतीय संशोधक दुर्लक्ष कसे काय करू शकतात? त्यातही त्यांना अनुल्लेखाने मारणे म्हणजे जरा अतीच झाले.
४ वाकाटकांकडे भारतीय इतिहास संशोधकांनी दुर्लक्ष केले हे खरे असले तरी अजिंठय़ाचा किंवा वाकाटकांचा कालखंड हा भारतीय इतिहासातील सुवर्ण कालखंड कसा काय ठरतो? त्याचे पुरावे कोणते?
– इतिहासातील सुवर्णयुगाचा महत्त्वाचा निकष त्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या कलेशी आणि कलाकृतीशी असतो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदत असतानाच सर्वोत्तम कला जन्म घेते असे आजवर जागतिक इतिहासात लक्षात आले आहे आणि सिद्धही झाले आहे. हाच महत्त्वाचा निकष लावायचा तर भारतातील सर्वोत्तम कलेचा आविष्कार म्हणजे अजिंठा. केवळ सुंदर चित्र आहेत म्हणून नव्हे तर त्या चित्रांतील ऐतिहासिक संदर्भच त्यांचे महत्त्व व सर्वोत्तम कालखंडातील त्यांचा जन्म स्पष्ट करतात. अजिंठय़ामध्ये काम करणारे कलावंत हे देशातील अतिकुशल असे कलावंत होते, हे तर कुणीच नाकारणार नाही. आपल्या आजूबाजूला जे घडत असते, दिसते त्याचेच प्रतिबिंब कलाकृतीमध्ये पडत असते. अजिंठय़ाच्या कलाकृतीमध्ये दिसणाऱ्या सर्वोत्तम वास्तुरचना त्यापूर्वीच्या कोणत्याही कलाकृतीमध्ये संपूर्ण भारतात पाहायला मिळत नाहीत. तसेच अजिंठय़ाच्या चित्रांतील दागिने, राजमुकुट हे सारे काही वेगळे होते. प्रत्यक्षात त्यासारख्या गोष्टी अस्तित्वात असल्याशिवाय त्याचे प्रतिबिंब लेणींमध्ये येत नाही, किंवा समकालीन चित्र-शिल्पांमध्ये येत नाही, असे जगभरातील कलेतिहासात सिद्ध झाले आहे. वज्रपाणी बोधिसत्वाचा राजमुकुट हा तर केवळ लोकविलक्षण कलाकृतीच आहे. याच चित्रांमध्ये आपल्याला अनेक विदेशी किंवा यवनही पाहायला मिळतात. त्यात ससेनिअनही आहेत ते नोकर-चाकर म्हणून येतात. त्यांना नोकर म्हणून ठेवणारे हे खचितच अधिक समृद्धच असले पाहिजेत. शिवाय अजिंठय़ासारखी कलाकृती निर्माण करायची तर खोऱ्यासारखा पैसा खर्च करावा लागणार. तत्कालीन स्थानिक राजा उपेंद्रगुप्त व वराहदेव यांच्या नोंदीही त्यांनी अजिंठय़ासाठी खोऱ्यासारखा पैसा खर्च केल्याचेच पुरावे देतात. म्हणजेच त्या वेळेस मध्य भारतातील वाकाटक सत्ता ही समृद्धीच्या कळसावर होती. अजिंठा हा त्या समृद्धीचा सर्वात मोठा ढळढळीत ऐतिहासिक पुरावा आहे. त्यामुळेच आता गुप्त नव्हे तर वाकाटक कालखंड म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते, हे इतिहास संशोधकांनी मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. राजा हरिषेणाला त्याचे योग्य ते श्रेय मिळायलाच हवे. त्याच्या हत्येनंतर सर्वानीच अजिंठय़ाचे उर्वरित काम तसेच वेगात पूर्ण केले. राजाच्या हत्येनंतर डोक्यावरील टांगती तलवार केव्हा पडेल ते माहीत नाही या भीतीनेच नंतरचे काम वेगात उरकण्यात आले, त्याचे पुरावे अजिंठय़ामध्येच पाहायला मिळतात. हरिषेणाच्या मृत्यूबरोबरच सारे काही संपुष्टात आले. पूर्वी मानले जायचे की, अजिंठय़ाच्या दुसऱ्या टप्प्याची निर्मिती ५ वे ते ७ वे शतक अशी दोनशे वर्षांमध्ये झाली. पण ते चुकीचे होते. ही दुसऱ्या टप्प्यातील निर्मिती केवळ १४-१५ वर्षांमध्ये म्हणजेच इसवी सन ४६२ ते ४७७ या कालखंडात झाल्याचे आता ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झाले आहे. भारतीय इतिहास आता नव्याने लिहिण्याची गरज आहे.
४ या नव्या संशोधनामुळे इतिहासात नेमका कोणता बदल होणे अपेक्षित आहे?
– अजिंठय़ाचा कालखंड निश्चित झाल्याचा सर्वात मोठा परिणाम मुंबईजवळच्या अप्रतिम अशा घारापुरी लेणींच्या कालखंडावर झाला आहे. पूर्वी असे मानले जायचे की, त्यांची निर्मिती ही आठव्या शतकात झाली आहे. मात्र आता ऐतिहासिक सत्य व पुरावे असे सांगतात की, त्यांची निर्मिती ही अजिंठय़ानंतर सहाव्या शतकात झाली आहे. त्यांचा कालखंड आता २०० वर्षांनी अलीकडे आला आहे. ज्या कलावंतांनी अजिंठय़ाची निर्मिती केली, त्यांच्याच पुढच्या पिढीतील कलावंतांनी घारापुरीच्या लेणींचेही काम केले आहे, हे शैलीशास्त्रानुसार सिद्ध झाले आहे. घारापुरीचा सहाव्या शतकातील निर्मितीचा सिद्धांत मांडतानाही ही अशाच प्रकारे शिलालेख, ऐतिहासिक
नोंदी एकमेकांशी ताडून पाहिल्या आहेत त्यानंतरच कालखंडाची मांडणी केली.
४ भारतीय इतिहास संशोधकांनी आता यापुढे काय करण्याची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
– ऐतिहासिक कालखंड निश्चित करताना केवळ उपलब्ध नोंदींवर जाऊ नका तर पुरातत्त्वीय पुरावेही ग्रा धरा. शिलालेखांचे अर्थ नव्याने लावता येत आहेत का, त्याचा शोध घ्या आणि नंतर सर्व प्रकारचे पुरावे एकत्र करून कालखंड निश्चिती करा. मग त्यातील त्रुटी आणि उणिवा कमीतकमी असतील व त्यात अचूकता अधिक असेल असे वाटते.
४ गेली ६० वर्षे अजिंठय़ावर काम केल्यानंतर अद्याप काही करावयाचे राहिले आहे, असे वाटते का?
– होय, अजिंठय़ावर मी आठ मोठे संशोधन खंड प्रकाशित केले आहेत. नवव्या खंडाचे काम सुरू आहे. पण अजिंठय़ाची व्याप्तीच एवढी जबरदस्त आहे की, अद्याप खूप काम बाकी आहे. आज वय ८६ च्या घरात आहे. तरीही अखेरच्या श्वसापर्यंत अजिंठय़ावरील संशोधनाचे काम सुरूच राहील, असे दिसते आहे.
विनायक परब