जागतिक कीर्तीचे कादंबरीकार, तत्त्वज्ञ आल्डस हक्स्ले यांच्या निधनाला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. दिवसाकाठी बारा तासांहूनही अधिक काळ लेखन, वाचन आणि व्यासंगात व्यतित करणारे हक्स्ले सर्वार्थाने विद्याव्रती होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुस्पर्शी होते. अतिरिक्त उपभोगवादामुळे मानवजात अध:पतनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परिणामी भविष्यकाळात माणसाला कोणत्या संभाव्य विकृतींना सामोरे जावे लागेल, याचे चित्र हक्स्ले यांनी ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये फार पूर्वीच रेखाटले आहे. त्याचे प्रत्यंतर आज आपल्याला येत आहे.
उ दंड वाचकप्रियता आणि समीक्षकमान्यता लाभलेल्या आल्डस हक्स्ले यांचे लेखन त्यांच्या बहुस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा व असाधारण बुद्धिमत्तेचा प्रत्यय देते. ‘विविध विषयांवरील आपल्या विचारांची उकल करण्यासाठी मी लेखन करतो,’ असे म्हणणाऱ्या हक्स्ले यांनी आपल्या चार दशकांच्या लेखन कारकिर्दीत कथा, कादंबरी, निबंध, समीक्षा, चरित्र, प्रवासवर्णन इ. साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले आणि विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. रिकाम्या वेळेत करमणुकीसाठी ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’चे खंड वाचणारे हक्स्ले हे स्वत:च एक ज्ञानकोश होते. सर रॉबर्ट सीटवेल या प्रख्यात लेखकाने हक्स्ले यांच्याविषयी म्हटले होते : ‘त्यांना (हक्स्ले यांना) पृथ्वीवरील सर्वच विषयांचे सखोल ज्ञान आहे. धर्म, साहित्य, राजकारण, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, चित्रकला, मानसशास्त्र, विज्ञान, समाजशास्त्र या क्षेत्रातील नव्या संशोधनाविषयी भाष्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे. त्यांना माहीत नाही, असा एक विषय या जगात नाही. परमेश्वराला सर्व काही समजते असे आपण मानतो; पण हक्स्ले यांना तर परमेश्वरापेक्षाही जास्त समजते.’ हक्स्ले यांचा जन्म २४ जुलै १८९४ रोजी इंग्लंडमध्ये झाला. हक्स्ले कुटुंब हे जणू विद्वत्तेचे माहेरघरच होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा पुरस्कार करणारे शास्त्रज्ञ टी. एच. हक्स्ले हे आल्डसचे आजोबा, तर ग्रीक भाषेचे प्राध्यापक व चरित्रलेखक म्हणून मान्यता मिळविणारे लिओनार्ड हक्स्ले हे वडील. हक्स्ले यांचे थोरले बंधू सर ज्युलिअन हक्स्ले हे प्राणीशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांची आई ज्युलिया ही शिक्षणतज्ज्ञ होती. प्रख्यात कवी आणि कलासमीक्षक मॅथ्यू आर्नोल्ड हे तिचे मामा. या अशा बौद्धिक वातावरणाचे संस्कार हक्स्ले यांच्यावर न होते तरच नवल! ते तर या सर्वापेक्षाही बुद्धिमान होते. शालेय शिक्षण घेत असताना आपण वैद्यकीय संशोधन करावे असे त्यांना वाटू लागले, पण इटन येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या डोळ्यांत दोष निर्माण झाला. त्यांचा डावा डोळा कायमचा निकामी, तर उजवा डोळा अधू झाला. त्यामुळे हक्स्ले यांना वैद्यकीय शिक्षणाचा विचार सोडून द्यावा लागला. आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या या दृष्टिदोषामुळे हक्स्ले निराशावादी वा निष्क्रीय झाले नाहीत, तर आपल्याला कोणत्याही क्षणी अंधत्व येऊ शकेल या जाणिवेने सदैव ज्ञानमग्न राहू लागले आणि पुढे-मागे अंधत्व आलेच, तर आपल्या ज्ञानार्जनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी ब्रेल लिपीही शिकून घेतली.
हक्स्ले यांनी काव्यलेखनाने आपल्या साहित्यनिर्मितीस आरंभ केला. ‘ऑक्सफर्ड पोएट्री’ या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. १९२० मध्ये त्यांचा ‘लेडा’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या ‘लिंबो’ या कथासंग्रहानंतर हक्स्ले गद्य लेखनाकडे वळले. ‘मॉर्टर कॉईल’ (१९२३), ‘लिटल मेक्सिकन’ (१९२४), ‘ब्रिफ कँडल्स (१९३०) हे त्यांचे आणखी काही कथासंग्रह. १९२१ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘क्रोम यलो’ ही हक्स्ले यांची पहिली कादंबरी. तिला मर्यादित यश लाभले. त्यानंतर दोनच वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या ‘अँटिक हे’मुळे हक्स्ले यांच्या नावाचा गाजावाजा झाला आणि ‘पॉइंट काऊंटर पॉइंट’ (१९२८) मुळे ते कादंबरीकार म्हणून साहित्यविश्वात स्थिरावले. १९३२ मध्ये प्रसिद्ध झालेली हक्स्ले यांची ‘ब्रेव्ह न्यू वल्र्ड’ ही कादंबरी सर्वार्थाने गाजली. किंबहुना हक्स्ले यांचे नाव घेतले, की सर्वप्रथम त्यांची हीच कादंबरी डोळ्यापुढे येते. यंत्राधिष्ठित मानवाच्या संभाव्य भवितव्याचा आलेखच हक्स्ले यांनी या कादंबरीत रेखाटला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मनाला विस्मित करणाऱ्या प्रगतीमुळे मनुष्याच्या व्यावहारिक जीवनातील काही समस्या सुटल्या आहेत, हे खरेच; पण अतिरिक्त उपभोगवादामुळे मानवजात अध:पतनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याच दिशेने आणि गतीने ही वाटचाल चालू राहिली, तर भविष्यकाळात माणसाला कोणत्या संभाव्य विकृतींना सामोरे जावे लागेल, त्याचे धक्कादायक चित्र हक्स्ले यांनी ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये रेखाटले आहे. सार्वत्रिकता, समानता आणि स्थैर्य यांच्या अतिरेकी आग्रहामुळे मानवी जीवनातील सारे सौंदर्य, चैतन्य व नाविन्य लयाला जाऊन जीवनाला एकसुरीपणा प्राप्त होईल, तसेच प्रेम, कृतज्ञता, निष्ठा, कलात्मकता व नैतिकता ही मूल्ये कालविसंगत सिद्ध होतील. हे सर्व स्पष्ट करताना हक्स्ले यांच्या निवेदनातील उपरोधाला कारुण्याचा स्पर्श झाला आहे. ‘गगनाला गवसणी घालणारी कल्पनाशक्ती’ हा शब्दप्रयोग आपल्याकडे वारंवार हाताळल्यामुळे आपली अस्तित्वमुद्रा गमावलेल्या चलनी नाण्याप्रमाणे वाटतो. तरीही या शब्दप्रयोगाच्या नेमक्या अर्थसामर्थ्यांचा प्रत्यय ही कादंबरी देते, असेच म्हणावे लागेल. ‘आयलेस इन गाझा’ (१९३२), ‘आफ्टर मेनी ए समर’ (१९३९), ‘दि जिनियस अँड दि गॉडेस’ (१९४३), ‘एप अँड इसेंस’ (१९४९) आणि ‘दि आयलंड’ (१९६२) या हक्स्ले यांच्या आणखी काही वाचकप्रिय कादंबऱ्या.
विविध साहित्यप्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या हक्स्ले यांनी कादंबऱ्या आणि निबंध या दोन साहित्यप्रकारांवर आपली लखलखीत नाममुद्रा उमटवली होती. त्यांना भूतकाळाचे आकर्षण असे नव्हतेच! वर्तमानकालीन घटनांचे विश्लेषण करून त्यांनी भविष्याच्या संभाव्यतेचा आलेख काटेकोरपणे काढला. त्यासाठी त्यांनी विविध विषयांना आपल्या व्यासंगकक्षेत घेतले. आधुनिक विज्ञानाचे भेदक ज्ञान तर हक्स्ले यांना होतेच! वैज्ञानिक प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकूणच समाजाचे जीवनमान सुधारले आणि कामगारांचे कामाचे तास कमी झाले. या स्थितीने निर्माण केलेल्या समस्यांचे मूलगामी विश्लेषण हक्स्ले यांनी केले होते. विज्ञानयुगातील प्रगतीमुळे माणसाला मोकळा वेळ मिळेल आणि त्यातून कला, तत्त्वज्ञान तसेच संस्कृती यांची भरभराट होईल व एकूणच मानवजात र्सवकष उन्नतीच्या दिशेने वाटचाल करू लागेल, असे जॉर्ज बर्नार्ड शॉ, एच. जी. वेल्स यांच्यासारख्या विचारवंतांना वाटत होते, पण हक्स्ले सांगतात की, ‘विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाला अगदी लहानलहान कामासाठी यांत्रिक शक्ती उपलब्ध झाल्याने त्याच्या वेळेची आणि परिश्रमांची बचत होईल. माणसाजवळ शिल्लक उरणारी ही अतिरिक्त ऊर्जा आणि रिकामा वेळ यांचा विनियोग तो विज्ञानजन्य सुखसाधनांच्या उपभोगात, सवंग वर्तनात किंवा विध्वंसक कृत्यात केल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य दिवसेंदिवस आत्मकेंद्रीत वृत्तीचा होत जाईल, हेच वैज्ञानिक प्रगतीचे नकारात्मक फलित असेल.’
हक्स्ले यांचे हे विश्लेषण खरे ठरल्याचे आपण पाहतोच आहोत. दूरदर्शनवरील सामान्य माणसाला रिझवणारे अभिरुचीशून्य कार्यक्रम आणि गुन्हेगारी जगताच्या तसेच विवाहपूर्व व विवाहबाह्य़ शारीरिक संबंधाचे चित्रण करणाऱ्या अश्लील कथा यांना लाभलेली लोकप्रियता पाहिली की आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेला रिकामा वेळ कोणत्या कामी खर्च होतो, हे सहजपणे लक्षात येईल. अहोरात्र दूरदर्शनवर चालू असलेले सवंग अभिरुची जोपासणारे कार्यक्रम आणि त्याच दर्जाचे वाङ्मय यामुळे आपले मनोरंजन नको तेवढय़ा प्रमाणात होते. त्यामुळे आपली विचारशक्ती खुंटते. विचार करायचा नाही, याच एका अटीवर जगायचे ठरवले की मानसिक पोकळी निर्माण होते आणि ती अपरिहार्यपणे विकृतीला जन्म देते.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विद्यमान वर्तमानकाळातील अनेक सामाजिक व व्यक्तिगत मानसिक व्याधींचे मूळ या अतिरिक्त सुखासीन तसेच रिकामटेकडय़ा जीवनप्रणालीत शोधता येईल- हे झाले आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि मध्यमवर्गाच्या संदर्भात! विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुखाच्या साधनांचा उपभोग घेणे ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसेल, त्यांना कसेही करून       (-प्रसंगी अनैतिक मार्गाचा अवलंब करून का होईना) ही साधने विकत घ्यावीशी वाटतील. अर्थ सरळ आहे की सुखाच्या साधनांची प्राप्ती हेच जीवनाचे साध्य होईल- आणि हेही ज्यांना शक्य नसेल, त्यांना आपला रिकामा वेळ घालविण्यासाठी विघातक कृत्यांखेरीज अन्य पर्यायच मुळी उरणार नाही. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि वैधानिक साधनांमुळे आपली हीच प्रतिमा (?) होणार असेल, तर आपले भवितव्य धोक्यात आहे, हे उघडच आहे. मानवाचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या आणखी एका गंभीर समस्येकडे हक्स्ले यांनी लक्ष वेधले आहे. विसाव्या शतकांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोठय़ा उद्योगधंद्यांची वाढ झाल्याने शहरांचा विस्तार झाला. लोकसंख्येत झालेली वाढ आणि प्रचंड औद्योगिकीकरण यामुळे निर्माण झालेल्या संघटनात्मक जीवनातून एका भयावह प्रवृत्तीचा उदय झाला. ती भयावह प्रवृत्ती म्हणजे ‘समूह मानव’.
‘समूह मानव’ म्हणजे काय?
प्रचंड औद्योगिकीकरण व वाढत्या लोकवस्तीची महानगरे यामुळे जीवनाचे संघटनात्मक बनले आहे. राहत्या जागेच्या सोसायटीपासून ते कामगार युनियनपर्यंत अनेक संघटना असतात. याशिवाय धार्मिक, राजकीय, जातीय संघटना असतात त्या वेगळ्याच! या संघटनांचा सदस्य होणे म्हणजे त्या संघटनांच्या अधीन होणे. ही अधीनता-पराधिनता व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करते. शिवाय दूरदर्शनसारखे नको तेवढे प्रभावी माध्यम आणि प्रचंड खपाची वृत्तपत्रे यामुळे आवडनिवड व अभिरुची समान होत जाते. समूह मानवाने आचार, विचार, भावना आणि करमणुकीची आवड याद्वारे जोपासलेली समानता म्हणजे अतिरिक्त सार्वत्रिकतेचा आग्रहच असतो. तो लोकशाहीला मारक तर असतोच, पण व्यक्तिस्वातंत्र्याचीही गळचेपी करतो. अशा समूह मानवप्रणित समाजरचनेत व्यक्तिगत विचारसरणी, वेगळी अभिरुची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व यांना कोणतेही स्थान नसते. समूह मानवाच्या उदयामुळे संस्कृतीचे रंग बदलून गेले. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचा या बदलत्या परिस्थितीत कोंडमारा होऊ लागला आणि लोकशाही धोक्यात आली. कारण समूहाला दिशा नसते; विचार नसतो. अशा समूहाला गरज असते ती हुकूमशहाची! हुकूमाहीच्या नावाखाली स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या माणसांची गळचेपी करणाऱ्या राज्यप्रणालीचे या समूह मानवाने बऱ्याच वेळा स्वागत आणि समर्थनच केले आहे. इतिहास सांगतो की, सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक, आर्थिक आणि कलात्मक मूल्यांची जोपासना व संवर्धन अशा एकाकी, पण स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या माणसांकडूनच झाले आहे; मानव समूहाकडून नव्हे!
हक्स्ले हे तत्त्वज्ञ होते. त्यांच्या वैचारिक लेखनाचा परिसर तत्त्वज्ञानाच्या प्रांतालगतचाच होता. ‘ऑन दि मार्जिन’ (१९२३), ‘एन्डस् अ‍ॅण्ड मीन्स’ (१९३७), ‘दि पेरिनिअल फिलॉसॉफी’ (१९४६), ‘सायन्स, लिबर्टी अँड पीस’ (१९४७), ‘प्रॉपर स्टडीज’ (१९४७), ‘ऑन आर्ट अँड आर्टिस्टस् (१९४८), ‘थिम्स अँड व्हेरिएशन्स’ (१९५२), ‘दि डोअर्स ऑफ पर्सेप्शन’ (१९५५) हे निबंधसंग्रह त्यांच्या बुद्धिवैभवाचे आणि वैचारिक श्रीमंतीचे प्रत्यंतर देतात. या निबंधसंग्रहातील त्यांचे अनेक विचार ‘तत्त्व’ म्हणून काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत. त्या दृष्टीने त्यांचा ‘एन्डस् अँड मीन्स’ हा निबंधसंग्रह पाहता येईल. त्यातील एका निबंधात त्यांनी ‘साधनसाध्यविचार’ मांडला आहे. त्यात हक्स्ले म्हणतात- ‘व्यक्तिगत तसेच समाजजीवनात साधन आणि साध्य यांचा निकटता संबंध असतो. कोणत्याही साधनांनी कोणतीही साध्ये प्राप्त करून घेता येत नाहीत; जे साध्य करावयाचे आहे, त्याला अनुरुप अशीच साधने निवडावी लागतात! समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही सर्वच विचारवंतांनी, धर्मसंस्थापकांनी व तत्त्वज्ञांनी अंतिम उद्दिष्टे म्हणून मान्य केली आहेत. पण प्रत्येकाची साधने वेगळी असल्याने गोंधळ निर्माण झाला व यापैकी एकही उद्दिष्ट साध्य झाले नाही.’ अनासक्ती व अनाग्रह यांचा पारंपरिक मार्ग या गोंधळातून आपल्याला मुक्त करू शकेल व आपल्या साध्याप्रत घेऊन जाईल, असे हक्स्ले सांगतात. त्याची मीमांसा त्यांनी ‘दि पेरिनिअल फिलॉसॉफी’त केली आहे.
दिवसाकाठी बारा तासांहूनही अधिक काळ लेखन, वाचन आणि व्यासंगात व्यतित करणारे हक्स्ले सर्वार्थाने विद्याव्रती होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुस्पर्शी होते. एकांताप्रमाणे लोकान्तात रममाण होणाऱ्या हक्स्ले यांना विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सहवास प्रिय वाटत असे. बॅलिऑल महाविद्यालयात शिकत असताना कॅथरीन मॅन्सफिल्ड, बट्र्राड रसेल यासारख्या प्रतिभावंतांशी मैत्री करणाऱ्या हक्स्ले यांचे नंतरच्या काळात आर. के. नारायण, जॉर्ज ऑर्वेल, ग्रॅहॅम ग्रीन, आर्थर कोस्लर यांच्याशी निकटचे संबंध आले. ग्रेटा गोर्बो ही अभिनेत्री हक्स्ले यांच्या लेखनाची भक्त होती. एकाच वेळी डी. एच. लॉरेन्ससारखा वादग्रस्त कादंबरीकार आणि जे. कृष्णमूर्तीसारखा तत्त्वज्ञ यांच्या सहवासात ते रममाण असत. (हक्स्ले यांच्या ‘आफ्टर मेनी ए समर’मधील एक व्यक्तिरेखा जे. कृष्णमूर्तीवर आधारित आहे तसेच कृष्ण्मूूर्तीच्या ‘फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम’ या ग्रंथाला हक्स्ले यांचा प्रस्तावना आहे.) हक्स्ले यांच्या ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. समर्थन वा विरोध या प्रतिक्रिया ज्ञानाच्या संदर्भात संभवतच नाहीत, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही सामाजिक, राजकीय वा धार्मिक पंथाचा स्वीकार केला नाही. अनुभवसिद्ध ज्ञानावरच ते अखेपर्यंत विसंबून राहिले.
एखाद्या प्राचीन भारतीय ऋषीप्रमाणे ज्ञानमग्न असणाऱ्या हक्स्ले यांनी लौकिक जीवनाच्या वास्तव कठोरतेची जाणीव मनात नेहमीच बाळगली होती. समग्र मानवजातीला भेडसावणारी समस्या म्हणजे लोकसंख्येची अतिरिक्त वाढ असे त्यांचे मत होते. लोकसंख्येच्या या स्फोटामुळे निकृष्ट दर्जाच्या व्यक्तींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून गुणवत्तेपेक्षा संख्यात्मकतेला अधिक महत्त्व येईल आणि जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होईल व विज्ञानाने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने साध्य केलेली प्रगतीही या वाढीमुळे कुचकामी ठरेल, असे हक्स्ले यांना वाटत होते. (त्यांच्या या भविष्यवाणीचे प्रत्यंतर जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांना आलेले आहे.) वैज्ञानिक प्रगतीच्या सर्व शक्यता गृहित धरूनही त्यातून अपरिहार्यपणे निर्माण होणाऱ्या अनैतिकतेला व सुखासिनतेला हक्स्ले यांचा सक्त विरोध होता. विज्ञानाच्या मदतीने जाणीवपूर्वक व अकारण होत असलेली नैसर्गिक साधनांची उधळपट्टी आणि त्याद्वारे होणारे पर्यावरण प्रदूषण याविषयी हक्स्ले यांना चिंता वाटत असे. विज्ञानावर नको तेवढा भरवसा ठेवल्याने मानवी जीवनातील कलात्मकता, आध्यात्मिकता व नैतिकता या मूल्यांची होत असलेली घसरण यामुळे ते एकंदर विज्ञानाविषयीच साशंक झाले होते.
१९६२ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘आयलंड’ ही हक्स्ले यांची अखेरची कादंबरी. भविष्यकालीन आदर्श समाजाचे चित्रण त्यांनी या कादंबरीत केले आहे. त्यानंतर वर्षभरातच ते कर्करोगाने आजारी पडून गेले. निधनापूर्वी ते पूर्णपणे अंध झाले होते आणि विचार करण्याची त्यांची क्षमता पूर्णपणे लयाला गेली होती. हक्स्ले यांच्या निधनाची दखल प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी घेतली नाही. कारण त्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांची हत्या झाली होती. २२ नोव्हेंबर १९६३ हा तो दिवस!
आल्डस हक्स्ले यांच्या निधनाला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. कोणताही अभिजात लेखक त्याच्या लेखनाद्वारे सदैव वाचकस्मरणात असतोच! हक्स्लेही त्याला अपवाद नाहीत. त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये त्यांनी रंगविलेले यंत्राधिष्ठित जग आता बऱ्याच प्रमाणात प्रत्यक्षात अवतरले आहे. लोकसंख्येच्या अतिरिक्त वाढीमुळे जीवनसंघर्ष भयावह झाला आहे आणि विज्ञानाने केलेली प्रगतीही या लोकसंख्येच्या मूलभूत गरजांची पूर्ती करताना हतबल झाली आहे. नैसर्गिक साधनांची अकारण उधळपट्टी चालू आहे आणि त्यातून उद्भवणारे पर्यावरणविषयक प्रश्न आपल्यासमोर गंभीर स्वरूपात उभे ठाकले आहेत. मानवी जीवनातील नैतिकता, कलात्मकता, स्वातंत्र्य, माणुसकी या मूल्यांची घसरण हा तर सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे. आल्डस हक्स्ले यांनी या संदर्भात दिलेले इशारे दुर्लक्षित केले गेले.
‘उध्र्वबाहुर्विरामेष्य न च कश्र्िचच्छृणोति माम्’ (मी हात उंचावून, ओरडून सांगत आहे, तरीही माझे कोणीही ऐकत नाही), अशी महाभारत लिहिणाऱ्या महर्षी व्यासांनी खंत व्यक्त केली होती. ही केवळ महर्षी व्यासांचीच शोकांतिका नाही, तर जगातील सर्वच विचारवंतांची हीच शोकांतिका असते.  मग आल्डस हक्स्ले तरी त्याला अपवाद कसे ठरणार?