भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकी प्रवासात सिनेमांतून होणाऱ्या मनोरंजनात काळानुसार बरेच बदल होत गेले; तसेच बदल झाले ते सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत. गेल्या काही वर्षांपर्यंत सिनेमे हे केवळ चित्रपटगृहांतच पाहण्याची सोय होती, आता कोणताही सिनेमा कधीही यू टय़ूबवर पाहता येतो. त्यामुळेच पूर्वी रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव या शब्दांना महत्त्व होतं. भक्तगण ज्या भावनेने मंदिराची पायरी चढतात, त्याच ओढीने चित्रपटगृहांच्या वाऱ्या करणारी रसिक मंडळी होती. अशाच सिनेमावेडय़ांपैकी एक म्हणजे लेखक सदानंद गोखले. उमेदीच्या दिवसांत गोखले यांनी वर्षांकाठी पाहिलेल्या शेकडो सिनेमांचं संचित म्हणजे त्यांचं हे पुस्तक. त्यांच्या सिनेमावेडाचं पुरेपूर प्रतिबिंब या पुस्तकात उमटलं आहे. हे सिनेमावेड केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून सिनेमातील विविध घटकांचा अभ्यास, चिंतन गोखले यांनी केल्याचं या पुस्तकाच्या पानोपानी जाणवतं. त्यामुळेच हे पुस्तक रंजकतेसह माहितीपूर्णही झालं आहे. या पुस्तकाची सात प्रकरणांमध्ये विभागणी आहे.
‘तंबूमधला सिनेमा ते मल्टिप्लेक्स थिएटर’ या पहिल्या प्रकरणात लेखकाने जागतिक सिनेमाचा इतिहास मांडला आहे. सिनेमाच्या या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी अनेक जुन्या संदर्भाचा धांडोळा घेतल्याचं दिसतं. ल्युमिएर बंधूंनी पॅरिस येथे २८ डिसेंबर १८९५ या दिवशी प्रथमच प्रोजेक्टरमधून चलत्चित्र दाखवलं, या प्रयोगाला लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर या बंधूंनी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये हा खेळ केला. त्यावेळी पडद्यावर दिसणारी ट्रेन आपल्या अंगावर येईल, या भीतीने काही प्रेक्षकांची गाळण उडाली होती, हे आज वाचताना हसू येतं. या प्रकारे चलत्चित्र दाखवणाऱ्यांची संख्या पुढे वाढतच गेली, मुंबईत होणाऱ्या यातील अनेक खेळांना दादासाहेब फाळके उपस्थित असत. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी अथक परिश्रम, चिकाटी व कल्पकतेच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, हा इतिहास रोमांचकारीच.
सुरुवातीच्या काळातील बाळबोध कल्पनांनी कात टाकल्याने गेल्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय सिनेमा अधिकाधिक कसदार व परिपूर्ण होत गेला. उत्तमोत्तम सिनेमांची निर्मिती करण्याची निकोप स्पर्धाच तेव्हाच्या दिग्दर्शकांमध्ये सुरू झाली. याचेच फलित म्हणजे ‘मदर इंडिया’, ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘प्यासा’ यासारखे सदाबहार सिनेमे. या सर्वागसुंदर सिनेमांचं लेखकाने ‘अजरामर चित्रपट’ या प्रकरणात रसग्रहण केलं आहे. या सिनेमांच्या सर्व अंगांचं सौंदर्य त्यांनी नेमकेपणाने उलगडून दाखवलं आहे. यातील ‘प्यासा’ हा तर ‘हॉल ऑफ फेम’ सिनेमा, मात्र ‘मदर इंडिया’ पाक्षिकाच्या बाबुराव पटेल यांनी आपल्या परीक्षणात या सिनेमावर कशी झोड उठवली होती, याचा एक उताराही लेखकाने दिला आहे. ‘दो आँखे बारह हाथ’मधील नायकाच्या भूमिकेसाठी शांताराम यांना दिलीपकुमार हवा होता. दिलीपकुमारने अवास्तव म्हणजे २० लाखांच्या मानधनाची मागणी केली. कलाकारांना डोक्यावर बसू न देणाऱ्या शांताराम यांनी ती मागणी मान्य केलीही, मात्र दिलीपने संभाव्य नफ्यामध्येही भागीदारी मागितली. यानंतर शांताराम यांनी त्याचा नाद सोडला व ती भूमिका स्वत:च साकारली, ही रोचक माहितीही लेखकाने दिली आहे. ‘गुजरा हुआ जमाना’ या अन्य एका प्रकरणात लेखकाने ‘काला पानी’, ‘चलती का नाम गाडी’, ‘यहुदी’, ‘फिर सुबह होगी’, ‘साधना’, ‘हावडा ब्रिज’ आदी सिनेमांच्या आठवणी चाळवल्या आहेत.
आपल्याकडच्या सिनेमांमध्ये विनोदी अभिनेत्यांना तोंडी लावण्यापुरतंच महत्त्व असूनही या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली, याचं वर्णन ‘हसरी गॅलरी’ या प्रकरणात लेखकाने केलं आहे. हे सांगताना त्यांनी राधाकिशन, चार्ली जावडेकर या फार जुन्या कॉमेडियन्सचीही दखल घेतली आहे. गोप, आगा, सुंदर, मुक्री, ओमप्रकाश, किशोरकुमार, मेहमूद, केश्तो मुखर्जी, जॉनी वॉकर, राजेंद्रनाथ, आय. एस. जोहर आदी असंख्य विनोदी अभिनेत्यांची वैशिष्टय़ं लेखकाने वाचकांसमोर मांडली आहेत.
संगीत हे तर भारतीय सिनेमांचं वेगळेपण. लेखकाला संगीताचाही कान असल्याने (त्यांचे वडील म्हणजे पं. मुकुंदराव गोखले हे ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक) त्यांनी ‘साज और आवाज’ या प्रकरणात अनेक संगीतकारांच्या शैलींचा वेध घेतला आहेच, मात्र चित्रपटगीतांसाठी वापरल्या गेलेल्या नानाविध वाद्यांचीही दखल घेतली आहे, हे विशेष. ‘थिरकणाऱ्या तारका’ आणि ‘रुपेरी पडद्याची शंभर वर्षे’ ही प्रकरणेही वाचनीय झाली आहेत. एका सिनेमावेडय़ाचं हे भावविश्व वाचताना आपल्यातील सिनेमावेडाही नकळत जागा होतो. अनेक सिनेमांच्या अनेक आठवणी मनात फेर धरतात, हे या पुस्तकाचं यश.
यादों की महफिल- सदानंद गोखले, राजे पब्लिकेशन्स, पृष्ठे- १८४, मूल्य- १९० रुपये. ॠ

आवडनिवड –
संदेश भंडारे
आवडती पुस्तके
१) हिंदी संस्कृती आणि  अहिंसा – धर्मानंद कोसंबी
२) वासूनाका – भाऊ पाध्ये
३) अंताजीची बखर  – नंदा खरे
४) वानप्रस्थ – डॉ. गणेश देवी
५) कळप- राजन गवस
६) परिपूर्ती- इरावती कर्वे
७) वाचू आनंदे – माधुरी पुरंदरे
८) दहा बाय दहा – दिलीप चित्रे
९) चित्रलिपी – वसंत आबाजी डहाके
१०) हत्ती इलो- अजय कांडर
नावडती पुस्तके
अनेक साहित्यकृती पूर्वी मला आवडल्या होत्या, परंतु त्या काही काळानंतर नावडत्या झाल्या. त्यामुळे न आवडलेल्या साहित्यकृतीला ‘नावडती’ म्हणणे मला पसंत नाही.