वाळवा येथील महादेव कुंभार या तरुणाने व्हॉट्स अ‍ॅपवर स्वत:ला श्रद्धांजली वाहणारा संदेश मित्रांना पाठविला आणि नंतर आत्महत्या केली. अशा घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आल्याची कितीही हाकाटी पिटली जात असली तरी प्रत्यक्षात माणसांचे एकाकीपण अधिकच वाढलेले दिसते. इतकंच नव्हे तर मानवी संवेदनशीलताही हरवत चालली आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील तरुणाईची मानसिकता, बोकाळलेली मोबाइल-संस्कृती आणि त्याची कारणं यांचा वेध..

कृष्णाकाठच्या कसदार मातीने स्वातंत्र्य चळवळीला धगधगता अंगार दिला. याच मातीत ‘हाताच्या मुठीत विश्व’ सामावणाऱ्या नव्या पिढीतील महादेव कुंभार या १९ वर्षांच्या तरुणाने आपली इहलोकीची यात्रा स्वत:च्या हाताने संपविली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांशी त्यासंबंधात संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर केला. मात्र, त्याची विचारपूस करण्यासाठी वा त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कोणीही मित्र पुढे आला नाही. सोशल मीडियाच्या होत असलेल्या अतिरेकी वापरामुळे असेल कदाचित; पण हा थट्टामस्करीचाच भाग समजून त्याच्या मित्रांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे.
महादेवने दहावीच्या परीक्षेत चार वेळा प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते. आई-वडील रोजंदारी करणारे. त्यातही वडील जगन्नाथ कुंभार यांना मणक्याचा त्रास असल्याने ते कधीतरी कामाला जात. आई शांताबाईला दीडशे रुपये मजुरीवर दिवसभर दुसऱ्यांची राने तुडवावी लागत. तिच्या कमाईवरच तिघांचं कसंबसं पोट भरे.
कराड तालुक्यातील कासार शिरंबे येथून २० वर्षांपूर्वी पोटासाठी त्यांनी कृष्णाकाठचे वाळवा गाठले होते. नदीकाठचं गाव असल्याने शेतात रोजंदारीला मरण नव्हते. त्यामुळे येथेच हे कुटुंब वस्ती करून राहिले. स्वत:चे घर मात्र त्यांना घेता आले नाही. कायम भाडय़ाच्या घरातच ते राहत आले. दोन मुलींची लग्ने केली. थोरली अश्विनी इस्लामपुरात, तर धाकटी स्वाती कराड तालुक्यातील मसूर येथे दिलेली. राहता राहिला म्हातारपणाची काठी असणारा महादेव.
एकुलता एक असल्याने त्याने कामधाम केले नाही तरी त्याची हौसमौज पुरवणे हे आई-वडील आपले कर्तव्यच समजत. त्यातून महादेवच्या गरजा वाढत गेल्या. मोबाइल हातात आला अन् महादेवचा वेळ मजेत जाऊ लागला. व्हॉट्स अ‍ॅपवर मित्रांशी गप्पा मारता मारता महादेव या खेळण्याच्या कधी अधीन झाला हे त्याचे त्यालाही कळले नाही. महादेवचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिचा नकार त्याला सहन झाला नाही. त्या नराश्येतून त्याने मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवरून स्वत:चा फोटो टाकून श्रद्धांजली वाहिली. ज्या मित्रांना त्याने हा संदेश पाठवला, त्या मित्रांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. कोणीतरी याबद्दल आपल्याला सहानुभूतीने विचारेल अशी महादेवची अपेक्षा होती. पण कोणीच विचारणा न केल्याने दु:ख असह्य़ होऊन तो अधिकच उद्विग्न झाला असावा.
घरात आपल्याच व्यापांत गुंतलेले निरक्षर आई-वडील त्याच्या मनात काय चालले आहे याचा कानोसा घेऊ शकले नाहीत. नकळत्या वयात हाती आलेले मोबाइल नामक जादुई  खेळणे आणि तारुण्यसुलभ आकर्षण म्हणजेच प्रेम अशी ठाम समजूत यामुळे भावनावेगात महादेव वाहवत गेला असावा. घरात आपली वेदना सांगण्यासारखे कोणी नाही. कोणाच्या खांद्यावर विश्वासाने डोकंठेवून अश्रूंना वाट करून देण्याची संधी नाही. असा कोंडमारा झालेल्या महादेवने शेवटी व्हॉट्स अ‍ॅपवर स्वत:ला श्रद्धांजली वाहणारा संदेश मित्रांना पाठवून मृत्यूला कवटाळले. जाता जाता  आपल्या कुटुंबासमोर आणि समाजासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह ठेवून तो गेला.
आज संपर्कक्रांतीच्या वेगवान युगात माणसामाणसांतील संवाद मात्र हरवत चाललेला आहे. मुलांना चांगले-वाईट यातला फरक कळण्यापूर्वीच मोबाइलचे खेळणे त्यांच्या हाती येते आणि ती त्याच्या अधीन होतात. बऱ्याचदा मोटारबाईक आणि मोबाइलसाठी पालकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडतात. बहुतेक पालक त्यास बळी पडतात. परंतु आपला मुलगा त्याचा योग्य तो वापर करतो की नाही, याचा मात्र त्यांना बऱ्याचदा थांगपत्ता नसतो.
वाळव्याच्या महादेव कुंभारची आत्महत्या ही प्रातिनिधिक म्हणता येईल. पन्नाशीच्या पालक-पिढीला मोबाइलचा वापर केवळ संपर्क साधण्यासाठी होतो, एवढेच माहीत असते. मुलांच्या मोबाइलमध्ये कोणकोणते अ‍ॅपस् आहेत, त्यांचा ते कशासाठी वापर करतात, याची पालकांना पुरेशी माहिती नसल्याने तरुणाई निर्धास्त असते. त्यामुळे मोबाइल वा इंटरनेटद्वारे मुलांकडून काही विपरीत गोष्टीकेल्या जात असल्याची जाणीवही पालकांना नसते. ती ज्यावेळी होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. पूर्वी ग्रामीण  भागात रात्रीचे जेवण सर्वानी एकत्र घ्यायचा दंडक असे. आता घरोघरी टीव्ही आल्याने आई त्यावरील मालिका पाहण्यात गुंग आणि वडील आपल्या व्यापात. त्यामुळे तरुणाईचे काय चालले आहे, हे समजून घेण्यास त्यांना वेळ नाही. या दुर्लक्षाची किंमत पालकांना मोजावी लागत आहे.
मोबाइल ही बदलत्या युगाची गरज आहे, हे मान्य. पण कितीही झाले तरी मोबाइल माणसाच्या परस्परांबरोबरच्या प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. व्हॉट्स अ‍ॅपवरून जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळवण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या ज्ञानाचा आपल्या आयुष्यासाठी उपयोग करून घेणारी तरुणाईसुद्धा आहेच. शेवटी कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘ग्लास अर्धा भरला आहे असे म्हणतानाच अर्धा रिकामा आहे’ असेही म्हणता येते. पण काय म्हणायचे, हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे.    ठ