अमेरिकेत सजग बालवाचक घडविण्याच्या दृष्टीने अनेका कल्पक उपक्रम राबविले जातात. त्यात मुलांना अक्षरओळख झाल्यापासून ते ती चांगले वाचायला लागेपर्यंतच्या विविध पातळ्यांचा अंतर्भाव असतो. त्यांच्यासाठी म्हणून पुस्तकांची मांडणीही अत्यंत सृजनात्मक पद्धतीने केली जाते. पुस्तकांची दुकानेही मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी हातभार लावतात. ग्रंथालयांतही मुलांना वाचनप्रवृत्त करणारे उपक्रम योजले जातात. आपल्याकडे मात्र याच्या नेमके उलटे चित्र दिसून येते. ‘उद्याचा वाचक’ घडविण्यासाठी आपण योजनापूर्वक काहीच करत नाही. छोटय़ा वाचकांना केंद्रस्थानी ठेवून जाणीवपूर्वक काही कल्पक योजना राबविल्यास आपल्यालाही हे उद्दिष्ट साध्य करणं सहज शक्य आहे.
‘आजकाल मुले वाचतच नाहीत..’ ही सार्वत्रिक तक्रार ऐकू येते. परंतु खरा प्रश्न आहे तो मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? सुटेपणाने काही शाळा, काही पालक वा शिक्षक जाणीवपूर्वक याकरता प्रयत्न करतातही; पण ते पुरेसे नाहीत. महापालिकेच्या शाळेत शिकणारे, तसेच ग्रामीण भागातील मुलांपर्यंत अभ्यासक्रमातील पुस्तकांखेरीज इतर पुस्तके किती प्रमाणात पोहोचतात? वाचक म्हणून मुलांचा विकास व्हावा यासाठी काहीएक धोरण आपल्याकडे आहे का? असल्यास ते योग्य प्रकारे राबविले जाते का? या प्रश्नांच्या अनुषंगाने काही चर्चा व्हावी, हा या लेखाचा हेतू आहे.  
दोन वर्षांपूर्वी मी अमेरिकेत ह्य़ूस्टनला गेले होते, त्यावेळी नुकतीच वाचायला शिकत असलेली साडेचार वर्षांची इरा आणि हाती पडलेले चारशे-साडेचारशे पानांचे पुस्तक झपाटल्यासारखे दिवस-रात्र वाचून काढणाऱ्या नऊ वर्षांच्या गार्गीला पाहिल्यावर मला तिथल्या बालवाचनाबद्दल कुतूहल वाटू लागले आणि तिथे जे पाहिले, अनुभवले, त्यातले आपल्याकडे काय करता येऊ शकेल, याविषयी मनात विचारचक्र सुरू झाले.
तिथे बालवाचक घडविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले जातात. अक्षरओळख झाल्यापासून मूल चांगले वाचायला लागेपर्यंतच्या तीन पातळ्या तिथे कल्पिल्या जातात. पुस्तकाच्या मलपृष्ठावर बहुधा ‘फॉर फर्स्ट लेव्हल’ किंवा ‘फॉर सेकंड लेव्हल’ असे नोंदलेले असते. पहिल्या पातळीवरची पुस्तके तीन ते पाच या वयोगटासाठीची. मोठी अक्षरे, मोठमोठी रंगीत चित्रे असलेली व घट्टमुट्ट बांधणीची ंवा प्लॅस्टिक पानांची ही जेमतेम १४-१६ पृष्ठांची पुस्तके असतात. प्रत्येक पानावर छोटे शब्द असलेली व तीन-चार शब्दांची दोन ते चार वाक्ये असलेली ही पुस्तके. विशेषत: इंग्रजीतील अ, ए, क, ड, व या स्वरांचे शब्दातील स्थान काय? त्या शब्दातील व्यंजनांवर ते कसा परिणाम करतात, त्यामुळे शब्दाचा उच्चार कसा होतो, याबद्दलचे ज्ञान त्यात मुलांना मिळेल याचे भान ठेवणारी ही वाक्ये असतात. दुसऱ्या पातळीवरील पुस्तके साधारणत: पाच ते सात या वयोगटासाठी असावीत. या पुस्तकांतही मोठी रंगीत चित्रे असतात. परंतु इथे अक्षरांचा आकार थोडा लहान होतो. ही पुस्तके २० ते २५ पृष्ठांची असतात. प्रत्येक पानावर तीनपासून नऊपर्यंत वाक्ये असतात. वाक्ये व शब्दही अधिक मोठे असतात. त्यात विरामचिन्हांचा वापर असतो. जाणीवपूर्वक नवनव्या शब्दांचा वापर केला जातो. काही पुस्तकांच्या अखेरीस नव्या शब्दांचे अर्थही दिलेले आढळतात.
ही पुस्तके वाचता वाचता मुलांना वाचनाची गोडी लागते. तिसऱ्या पातळीवरील पुस्तकांतून त्यांना वाक्यांचे वेगवेगळे प्रकार परिचित करून दिले जातात. वाक्यांचे परिच्छेद त्यांच्यासमोर येतात. त्यांच्या शब्दसंपत्तीतही भर पडत जाते. या पुस्तकांत चित्रे असतात; परंतु त्यांचा आकार लहान असतो. आठव्या-नवव्या वर्षांपर्यंतची बहुसंख्य मुलं थोडय़ा मोठय़ा अक्षरांतली दीडशे-दोनशे पानांची पुस्तके आवडीने वाचू लागतात.
पहिल्या पातळीवरील पुस्तके अर्थातच अधिक रंजक असतात. पक्षी, प्राणी, निसर्ग मुलंमुली यांचे एकत्रित मजेशीर जग त्यांत असते. दुसऱ्या पातळीवरील पुस्तकांतून ‘फिक्शनल अ‍ॅण्ड नॉन- फिक्शनल’ यांतला फरक अधिक ठळक होतो. कल्पनारम्य पुस्तकांतून पशू-पक्षी-मुले यांचे जग एकत्रित असले तरी आता त्यातून बालमनावर काही मूल्ये ठसविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतो. उदा. शिस्त, स्वच्छता, एकमेकांच्या उपयोगी पडणे, वस्तू वाटून घेणे, निसर्गाची काळजी घेणे, इ. त्याचप्रमाणे काही सामाजिक मूल्यांसंबंधीही ही पुस्तके मुलांशी हितगुज करतात. या वयातल्या वाचकांच्या हाती जी ल्लल्ल-ऋ्रू३्रल्लं’ पुस्तके येतात त्यांतही विषयांची विविधता असते. निसर्गातील पशुपक्षी, वृक्ष, प्रदेश यांची माहिती, आकाशातील ग्रहगोलांची माहिती, रंग, आकार व त्यांचे व्यवहारातील जगाशी असलेले अनुबंध, भाषेतील गमतीजमती, आकडय़ांच्या गमती, अनेक व्यवसायांत करावी लागणारी कामे व कर्तव्ये, विज्ञानातील शोध, ऐतिहासिक व्यक्तींच्या गोष्टी असे नानाविध विषय रंजकतेने आणि सोप्या भाषेत मांडलेले असतात. माहितीला पूरक ठरणारी रंगीत चित्रे या पुस्तकांत असतात. अशा पुस्तकांकडे मुलांचा ओढा अधिक असतो. कदाचित नवे ज्ञान आत्मसात करण्याचे हे त्यांचे वय असते, हे त्यामागचे कारण असावे. इथेच बालवाचक आकाराला येऊ  लागतो.
सार्वजनिक ग्रंथालयांतील बालवाङ्मयाचा विभाग खूपच मोठा असतो. दोन ते चार वयोगटातील मुलांसाठीची पुस्तके व्हिडीओ-सीडीसह असतात. एक-दोन वेळा या विभागात छोटय़ा टेबल-खुच्र्याशी बसून काही आज्या मुलांना साभिनय गोष्टी वाचून दाखवतानाही दिसल्या. नुकतीच अक्षरओळख होऊ लागलेल्या मुलांपासून किशोरवयीन वाचकांपर्यंत त्यांच्या वयोगटानुसार पुस्तकांचे विभाग असतात. मुलांना शाळांतून दिले जाणारे प्रकल्प
तयार करायला ही ग्रंथालये त्यांना खूपच मदत करतात.
ग्रंथालयांचा आणखी एक उपक्रम मुलांना वाचनास प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उन्हाळ्याच्या सुटीत हा उपक्रम राबवला जातो. नुकतंच वाचायला शिकलेल्या मुलांनी २० पुस्तके वाचली की त्यांचे पालक त्याचा तपशील ग्रंथालयास सादर करतात. मग त्या मुलाला ग्रंथालयातर्फे  चषक आणि प्रमाणपत्र मिळते. त्या प्रमाणपत्रावर ग्रंथालयाच्या ग्रंथपालाच्या सहीबरोबरच टेक्सासच्या गव्हर्नरची सही आणि राज्य ग्रंथपालांचीही सही असते. अधिक मोठय़ा मुलांसाठी हा चषक व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी २० तास वाचनाची अट असते.
शाळेच्या ग्रंथालयांसाठी प्रारंभी तिथे शिक्षण विभागाकडून भरघोस रक्कम दिली जाते. नंतर ग्रंथालय वाढवण्याची जबाबदारी मात्र शाळांची असते. शाळेच्या ग्रंथपालाकडे प्रथम प्रशिक्षित शिक्षकाचे प्रमाणपत्र असावे लागते. ग्रंथालयात पुस्तके देण्याघेण्यासाठी पालक स्वयंसेवकही मदत करत असतात.
पुस्तक वाचायचे म्हणजे आपण काय वाचतो, त्याचे आकलन झाले पाहिजे. तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गार्गीने सांगितले, ‘वाचायचं कसं याची एक ‘स्ट्रॅटेजी’ असते आजी. आम्हाला ती शिकवलीय. त्यासाठी पाच अक्षरं लक्षात ठेवायची. P, R, I, D आणि E. आता तुला त्याचे अर्थ सांगते. P = Preview. तुम्हाला वाचायला जे काही वाचनसाहित्य दिलेले असते, त्याचे तुम्ही भाग करायचे आणि त्यावर तुमच्या नोट्स लिहायच्या. R = Read. तुम्ही ती गोष्ट असली तर गोष्ट, माहिती पुन: पुन्हा नीट वाचायची. I = Investigation. तुम्हाला त्यावर प्रश्न दिलेले असतात. ते कशासाठी आहेत, हे समजून घ्यायचे. D = Determine the answers. तुम्ही लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत का, ते तुम्हीच पाहायचे. E = Evaluate. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तीन नाही तर चार उत्तरे दिलेली असतात आणि प्रत्येक प्रश्नासमोर दोन बॉक्स असतात. एका बॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला बरोबर वाटलेल्या उत्तराचा नंबर लिहायचा आणि तुमचे उत्तर तुम्हाला कुठल्या क्रमांकाच्या पॅराग्राफवरून बरोबर वाटलेय, त्याचा नंबर दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचा.’’
वाचन कसे करायचे, याचा वस्तुपाठ मुलांना इतक्या लहान वयात करून दिला जातो. विद्यार्थ्यांची आकलनक्षमता अजिबात कमी लेखली जात नाही आणि ती अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक वर्गासाठी आठवडय़ातून एकदा पुस्तक बदलून देण्याचा वार असणे एवढय़ापुरतेच शाळेच्या ग्रंथालयांचे काम सीमित नाही. काही वाचनप्रेमी मुले आठवडय़ातून दोन-तीन वेळाही पुस्तके बदलतात. विद्यार्थ्यांना टॅग्ज् मिळवायचे असतील तर ग्रंथालय त्यासाठी विद्यार्थी जी पुस्तके वाचायला नेतात त्या पुस्तकांवर करता येण्याजोग्या प्रकल्पांची एक यादी त्यांना देते. त्यातील कुठलाही एक विषय निवडून विद्यार्थी त्यावर प्रकल्प करू शकतो. उदा.: २६/ ११ च्या अमेरिकेतील हल्ल्यासंबंधीचे एखादे पुस्तक आहे, तर कार्डबोर्डचे ट्विन टॉवर्स तयार करणे, ट्विन टॉवर्ससंबंधी तसेच हल्ल्यासंबंधी माहिती जमवणे, त्या घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या फोटोंचे संकलन करणे, या हल्ल्यात मारल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीचे तुम्ही आप्त आहात अशी कल्पना करून मनोगत लिहिणे, इ. किंवा एकाच विषयावरील कादंबरी आणि नाटक वाचले तर त्याची तुलना करणे. ऐतिहासिक कादंबरी वाचली तर इतिहासातील घटना आणि कादंबरीतील घटना यांतील साम्य-भेद लिहिणे. एखादे वैज्ञानिक पुस्तक वाचले तर त्यावरील कविता व गोष्टी जमवणे किंवा त्यांनी स्वत: त्या तयार करणे अथवा त्या पुस्तकातील विषयाशी निगडित (पारिभाषिक) शब्द निवडून एखादा शब्दखेळ तयार करणे, एखाद्या गोष्टीतील एखादे पात्र तुम्ही आहात अशी कल्पना करून त्याची दैनंदिनी लिहिणे.. असे मुलांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणारे कितीतरी विषय पुरवले जातात. त्यातून मुलांचे वाचन समृद्ध होते. त्यांना वाचनाची दृष्टी मिळत जाते आणि त्यांच्यातील लेखनकौशल्येही विकसित होत जातात. विद्यार्थ्यांने आपला प्रकल्प ग्रंथालयाला सादर केला व तो ग्रंथालयाला योग्य वाटला, की मग शाळेच्या टी.व्ही.वरून त्या विद्यार्थ्यांला टॅग मिळाल्याचे जाहीर होते. विद्यार्थी असे टॅग्ज जमा करतात. कारण अधिकाधिक टॅग्ज म्हणजे अधिकाधिक बक्षिसे! उदा. चार टॅग्ज मिळाले तर प्रिन्सिपॉलबरोबर आइस्क्रीम. आठ टॅग्ज मिळाले तर आइस्क्रीम + घोडागाडीत बसून शाळेच्या ग्राऊंडला फेरी. १२ टॅग्जसाठी तर या दोन गोष्टी + प्रिन्सिपॉलसह एखाद्या मजेशीर ठिकाणी पिकनिक. बालवयातील मुलांसाठी ही नक्कीच आकर्षणे असतात.
बालवाचकांकडून बालसाहित्यिकाचा गौरव ही तर फारच भन्नाट कल्पना. मुलांनी वर्षभरात त्यावर्षी प्रसिद्ध झालेली जी पुस्तके वाचली असतील, त्यांतील आपल्या आवडत्या पुस्तकांना १, २, ३ क्रमांकाची मते द्यायची व ती ग्रंथालयात ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकायची. संपूर्ण टेक्सासमधील शाळांमधून विद्यार्थी हे मतदान करतात. यातील पहिल्या क्रमांकाची मते ज्या पुस्तकाला सर्वाधिक मिळालेली असतील, त्या पुस्तकाची त्यावर्षीच्या ‘ब्लू बॉनेट’ पुरस्कारासाठी निवड होते. म्हणजे बालवाचकाला लिंबूटिंबू समजले न जाता जबाबदार वाचक मानले जाते.
इथली पुस्तकांची दुकानेही मुलांना वाचनाची गोडी लावण्यात हातभार लावतात. बालविभागातल्या एखाद्या पुस्तकावर ते प्रश्नावली देतात, ती भरून द्यायची. किंवा एखाद्या पुस्तकाविषयी तुम्हाला काय वाटते, ते लिहून द्यायचे. मग त्या बालवाचकाला एक पुस्तक बक्षीस मिळते किंवा त्याच्या आवडीचे पुस्तक घ्यायला ‘गिफ्ट व्हाऊचर’ मिळते.
मुलांनी वाचावे, त्यांच्यातून एक चोखंदळ वाचक घडावा म्हणून आपण काय प्रयत्न करतो? सधन घरांतून तरी किती मुलांच्या हातावर खाऊ  म्हणून पुस्तक दिले जाते? किती मुले मोकळ्या वेळेत आपले आई-बाबा एकाग्र होऊन एखादे पुस्तक वाचताना बघतात? आणि पुस्तकांची भूक असलेल्या किती मुलांपर्यंत छान रंगीबेरंगी पुस्तके पोहोचतात?
आमच्या मुलांनी चांगले वाचक व्हावे, त्यांनी स्वतंत्र विचार करावा, त्यांची कल्पनाशक्ती बहरावी, त्यांना ज्ञानाचे नवनवे मार्ग कसे शोधावेत ते कळावे, यासाठी आपल्याला विचारपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील. उदा. १) मुलांना भाषा व्यवस्थित शिकवायची आहे हे लक्षात घेऊन आणि त्याचवेळी त्यांच्या बौद्धिक व भावनिक गरजा लक्षात घेऊन पुस्तकांची निर्मिती करणे. २) मुलांसाठी तयार झालेली पुस्तके सर्व स्तरांतील मुलांपर्यंत पोहोचवणे. ३) मुलांना वाचायला प्रवृत्त व प्रोत्साहित करणे. ४) मुलांना वाचनाची विशिष्ट दृष्टी देणे. ५) ही जबाबदारी आपली आहे हे पालकांबरोबरच शाळांची ग्रंथालये आणि मुख्य म्हणजे ग्रामपंचायतींपासूनच्या सर्व ग्रंथालयांनी ओळखणे व ती स्वीकारणे. महत्त्वाचे म्हणजे ६) बालवाचकाला लिंबूटिंबू समजून कमी न लेखणे. या व अशा गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. हे तिकडे शक्य आहे, आपल्याकडे नाही, असे म्हणणे ही फक्त पळवाट आहे. इच्छा असेल तर मार्ग काढता येईलच की!   

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती