काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी नारायण राणे यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून राणे यांचे मंगळवारी समाधान झालेले नाही. राणे यापुढे पक्षात राहण्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्या दबावाला किती बळी पडायचे, असा प्रश्न पक्षातूनच उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्रीदेखील मात्र राणे यांना महत्त्व देण्याच्या विरोधात आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राणे यांच्यात सुमारे दोन तास बैठक झाली. राणे यांच्या राजीनाम्यामागील कारणांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकीतील तिकीट वाटपात समर्थकांना झुकते माप मिळाले पाहिजे ही राणे यांची मागणी मात्र मान्य करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. या बैठकीतून आपले काही समाधान झालेले नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. मात्र बैठकीमुळ तोडगा निघेल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
राणे यांचे दोन दगडांवर पाय ?
काँग्रेसबरोबर चर्चेचा घोळ सुरू असतानाच राणे यांचे भाजप नेत्यांबरोबरही गुफ्तगू सुरू असल्याची चर्चा आहे. नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. भाजपकडून हिरवा कंदिल मिळाल्यास ते काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागण्याची शक्यता आहे. भाजपकडून अनुकूल प्रतिसाद न मिळाल्यास काँग्रेसमध्येच राहण्याचा त्यांचा कल असू शकतो. कुडाळमध्ये आपल्या मुलाला उमेदवारी देण्याची त्यांची योजना आहे.

मुख्यमंत्री-राणे यांचे परस्परविरोधी दावे
आपण उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे बैठक होईल व त्याला आपण, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहू, असे राणे यांनी सांगितले. मात्र अशी बैठक आपण आयोजित करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राणे यांच्या भावना आपण सोनिया गांधी आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या कानावर घालू, असे ते म्हणाले. एकूणच मुख्यमंत्री आणि राणे यांच्यात एकवाक्यता दिसत नव्हती. राजीनामा सादर करताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. तसेच चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्यास पक्षाला विजय मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केल्याने मुख्यमंत्री राणे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. राणे यांना नाहक महत्त्व दिले जाऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.