रायगड जिल्ह्य़ातील पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांमध्ये आता केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर आगामी काळात अनेक भागांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्य़ात चालू आíथक वर्षांत सरासरीच्या ७० टक्केच पावसाची नोंद झाली आहे. घटलेल्या पर्जन्यमानाचा परिणाम आता पाटबंधारे प्रकल्प आणि धरणांमधील पाणीसाठय़ावर होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याला अद्याप सुरुवात झाली तरी जिल्ह्य़ातील धरणांची पाणीसाठय़ाची पातळी २५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.
रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्या अख्यत्यारित २८ प्रकल्प आहे. या प्रकल्पांची संचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. यात आज १९ हजार ८४० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या २५ टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिला आहे. आंबेघर, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, पाभरे आणि उसरण या प्रकल्पांमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. घोटवडे, ढोकशेत, उन्हेरे, कुडकी, संदेरी, खैरे, भिलवली, कोलते मोकाशी, डोणवत, मोरबे आणि बामणोली या प्रकल्पांमध्ये २५ टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. तर फणसाड, श्रीगाव, कवळे, काल्रे, रानवली, वरंध, िखडवाडी, कोथुर्डे साळोख, अवसरे आणि पुनाडे प्रकल्पात १५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
श्रीवर्धनमधील रानवली आणि महाडमधील कोथुर्डे प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे, तर महाड तालुक्यातील खैरे, खालापूर तालुक्यातील भिलवली, उरण तालुक्यातील धरणाची पातळी तर अतिशय खालावली आहे. ही आसपासच्या परिसरातील लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोकणात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहे. अशा परिस्थितीत जर पाऊस लांबला तर जिल्ह्य़ातील अनेक भागांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे किमान महिनाभर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे धक्कादायक बाब भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. कर्जत, खालापूर, पेण, सुधागड पाली, तळा आणि म्हसळा तालुक्यांतील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता पाटबंधारे विभागाच्या धरणांमधील पाणीसाठा खालवल्याने परिस्थिती अधिकच बिकट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
रायगड जिल्ह्य़ातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पाांमध्येच ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी ९३ टक्के पाणीसाठा झाला होता. शेती आणि पिण्या साठी पाणी दिल्यानंतर आता पाणीसाठा २५ टक्क्यांवर वर आला आहे. काळ सिंचन प्रकल्पातून शेतीला पाणी देण्यााचे काम आता संपले आहे. त्यामुळे महसूल विभाग किंवा लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागातून मागणी आली तर आम्ही तातडीने पाणी देत आहोत. असे रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी सांगितले.

* जिल्ह्य़ात मागील वर्षी सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद
* ३१ ऑक्टोबर २०१५ ला धरणात ९३ टक्के पाणी साठा होता.
* रायगड जिल्ह्य़ातील २८ प्रकल्पात आता २५ टक्के पाणीसाठा शिल्लक.
* चार पाटबंधारे प्रकल्पात ० ते ५ टक्के पाणीसाठा.
* खालापूर, पेण, महाड, पोलादपूर तालुक्यांवर पाणीटंचाईचे संकट.