‘भाऊंचे उद्यान’ लोकार्पणप्रसंगी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांचे दु:ख भाऊंना माहीत होते. त्यामुळे त्यांनी शेती, माती, पाणी यावर जागतिक कीर्तीचे काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शहरातील काव्यरत्नावली चौकात उभारण्यात आलेल्या ‘भाऊंचे उद्यान-पद्मश्री भवरलाल जैन थीम पार्क’ लोकार्पणप्रसंगी पाटील यांनी भवरलाल जैन यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊंमध्ये कर्तृत्व व नम्रता हे दोन्ही गुण होते. या दोन्ही गुणांचा समन्वय

खूप दुर्मीळ असतो. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांनी सुखसमृद्धी आणली, असेही त्यांनी नमूद केले. १९८० मध्ये आपण अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून जळगावला आलो. तेव्हापासूनचा स्नेह भाऊंनी शेवटपर्यंत टिकवून ठेवला.

गरीब विद्यार्थ्यांंना पुस्तक उपलब्ध व्हावे अशी संकल्पना मांडल्यावर जैन पुस्तक पेढी योजना शहरात अमलात आली, अशी आठवणही पाटील यांनी सांगितली. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी प्रास्ताविकात उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्यात अभ्यासिका, ग्रंथालय, व्हिडीओ थिएटर, कलादालन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन उद्योग समूहाचा ग्रामीण विकासात मोठा वाटा असल्याचे मांडले. या उद्यानात साकारण्यात येणाऱ्या ग्रंथालयात जिल्ह्यतील

युवकांना उच्चपदाच्या संधी प्राप्त व्हाव्यात, त्याकरिता स्पर्धा परीक्षांसाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी उत्तमरित्या कशी जोपासता येते याचे उत्तम उदाहरण म्हणून जैन उद्योग समूहाकडे बघता येईल, असे नमूद केले. उद्यानांची निर्मिती होते, परंतु त्याची देखभाल होऊ  शकत नाही. या उद्यानाची देखभाल सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशननेच करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री सुरेश जैन यांनी शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबर प्रगतीत देखील भाऊंनी महत्वाची भूमिका बजावल्याचे मांडले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्योगासोबतच सामाजिक बांधिलकीला भाऊंनी दिलेला अग्रक्रम अभिमानास्पद आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद बाजुला सारत सर्वाँनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी  फक्त शहरच नव्हे, जिल्ह्यातील १५० खेडी निवडून खेडय़ांचा सर्वागीण विकास गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्याचा

मानस असल्याचे नमूद केले. महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुशील मुन्शी, आमदार चंदुलाल पटेल, राजूमामा भोळे, किशोर पाटील, पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर,  उपअधीक्षक मोक्षदा पाटील, मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय, उपमहापौर ललित कोल्हे, कविवर्य ना. धों. महानोर हेही उपस्थित होते.