माढा लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात कर्तव्य न बजावता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कुर्डूवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिल्पा नाईक यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. माढय़ाचे तहसीलदार विजय ठेंगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माढा पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
कुर्डूवाडी नगरपालिकेत मुख्याधिकारीपदावर कार्यरत असलेल्या शिल्पा नाईक यांची माढा लोकसभा मतदारसंघात व्हिडिओ व्हिनिंग पथकात नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्या १५ मार्च, २ व ३ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कामकाजात गैरहजर राहिल्या. याप्रकरणी नोटीस बजावूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नेमून दिलेल्या कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.