नारायण राणे यांची सिंधुदुर्गात एवढी ताकद असेल तर आमदार नीतेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवावी किंवा स्वतंत्र पक्ष काढून निवडणूक लढवावी, असे आवाहन राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. संघ विचारसरणीचा भाजपसारखा स्वच्छ प्रतिमा असणारा पक्ष राणे यांच्यासारख्यांना भाजप प्रवेश देणार नाही असे मला वाटते, असे दीपक केसरकर म्हणाले.

राज्याचे अर्थ, नियोजन, गृह राज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी संजय भोगटे, प्रकाश परब उपस्थित होते. राजकारणात येण्यापूर्वी नारायण राणे आयकर विभागात नोकरीस होते. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा प्रश्न करीत दीपक केसरकर म्हणाले, अंबानींच्या खालोखाल त्यांची प्रॉपर्टी आहे.

सिंधुदुर्गातील रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळातील कामे त्यांच्याच ठेकेदारांनी केली आहेत, हे ठेकेदार त्यांच्या अवतीभवती असतात त्यांनीच ९० टक्के कामे केलीत, त्यामुळे खोटे आरोप आपल्यावर करण्याचा नैतिक अधिकार नारायण राणे यांना नाही. खासदार, आमदार व माझ्या विरोधात खोटी अ‍ॅफिडेव्हिटे करायला त्यांच्याकडे माणसे आहेत. ते टक्केवारीनेच सारे मोजतात. त्यामुळे ठेकेदारांच्या पाठिंब्यावर ते काहीही करू शकतात, असे दीपक केसरकर म्हणाले.

नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येऊन राजकारण सुरू केल्यावर जिल्ह्य़ात दहशत निर्माण केली. त्यांच्यावरच कायम संशयाची सुई राहिली. त्यांच्या इतिहासाची सर्वाना जाणीव आहे. त्यामुळे पुन:पुन्हा त्यांची प्रवृत्ती उगाळायला लावू नये, असे दीपक केसरकर म्हणाले.

नारायण राणे यांनी राजकारणाच्या कारकीर्दीत जिल्ह्य़ात निर्माण केलेली स्वत:ची प्रतिमा जिल्हास्तरीय जाणतात, त्यामुळे नारायण राणे यांनी सभ्यतेचा आव आणू नये, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

राज्यातील खुनांचा तपास लागला पाहिजे म्हणून राज्य शासनाने बक्षीस ठेवले आहे. जिल्ह्य़ातील खुनांच्या तपासातदेखील माहिती देऊन बक्षीस मिळवू शकतात. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे गृह राज्यमंत्री म्हणून आवाहन करीत असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. भाजपसारखा चांगला पक्ष नारायण राणे यांना प्रवेश देईल, असे वाटत नाही. भाजपचा उदय संघपरिवारातून झाला आहे.