पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसला पहाटे सहाच्या सुमारास खंबाटकी बोगदा प्रवेशद्वारात अपघात होऊन पाच ठार तर १७ जखमी झाले आहेत. त्यातील सात प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
 मंगळवारी रात्री सीआर पाटना येथून पुण्याकडे जाण्यासाठी व्ही.आर.एल. ट्रॅव्हल्स कंपनीची आरामबस रवाना झाली. बुधवारी पहाटे सहा ते साडेसहाच्या दरम्यान खंबाटकी बोगद्यात जाण्यापूर्वी वेळे (ता. वाई ) गावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या नाल्यात घसरली. गाडी चालकाने अशाही स्थितीत गाडी नाल्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लगतच्या खडकाळ भिंतीला बसची दुसरी बाजू जोरदार घासल्याने गाडीतील बारा प्रवासी गंभीर जखमी झाले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वी चार तर रुग्णालयात नेल्यानंतर एक प्रवासी ठार झाला. गाडीत एकून ३८ प्रवासी होते. त्यातील पाच ठार झाले, चार मृतांची ओळख पटली आहे. सात जण गंभीर जखमी झाले तर दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रवासी कर्नाटकातील हसन, चिकमंगळूर जिल्हा परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. अधिक तपास भुईंज पोलीस करत आहेत.