हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे कोकणात मुसळधार पाऊस पडत असून चिपळूण जवळील परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. परिणामी  मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. प्रशासनाने वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत असून दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाने महामार्गावरील वाहतूकीसोबतच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गातील चिपळूण-खेड मार्गावरील रुळावर माती पसरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूकीवर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे तब्बल तीन ते चार तास उशिराने धावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने कोकण, मुंबई, मराठाड्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पुढचे आठ दिवस कोकण किनारपट्टी, मुंबई आणि मराठवाड्याला झोडपणारा पाऊस सप्टेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चिपळूणजवळील परशुराम घाटात सकाळी देखील एक दरड कोसळल्याने येथील वाहतूकही विस्कळीत झाली होती.  येथील वाहतूकही कराड मार्गे वळवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळपासूनच दरड बाजूला करण्याचे काम सुरू केले होते. मात्र आता पुन्हा दरड कोसळल्यामुळे वहातूकीच्या कोंडीमध्ये आणखी भर पडली आहे.  ही दरड दुर करण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात असलेल्या ओबळी या गावाजवळ दरड कोसळून तीन घरांचे नुकसान झाले होते.