उसाच्या फडात रमलेल्या बिबटय़ाचा आता माणसांशी संघर्ष कमी झाला आहे. सहजीवनाचा हा प्रवास आता लाभदायक ठरल्याने बिबटय़ांची संख्या वाढत असून नगर जिल्ह्य़ात ती शंभरीच्या पुढे गेली आहे.

१९९५ सालापर्यंत बिबटय़ाचे दर्शन हे केवळ अकोले तालुक्यात होत असे. भंडारदरा धरणाकडे जातांना त्याचे दर्शन झाले की, पर्यटक सुखावत. पण तेथील जंगलात त्यांना भक्ष्य व पाणी याची टंचाई जाणवू लागल्याने त्याने आपला अधिवास बदलला. गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांच्या कडेला असलेले उसाचे फड त्याला अधिक भावले. त्याचा अधिवास हा हळूहळू सरकत सरकत श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासे, संगमनेर या तालुक्यात झाला. १९९४ मध्ये जुन्नर भागात पहिल्यांदा बिबटय़ा मानवी वस्तीजवळ आढळल्याने त्याला वनखात्याने िपजरा लावून पकडले. पण २००३ पासून तो कुठे ना कुठे आढळतो. गावाच्या आजूबाजूच्या वस्त्यांवर शेळ्या, मेंढय़ांवर ताव मारण्यासाठी रात्री तो जातो. मग गावकरी वनखात्याला कळवून िपजरा लावण्यास सांगतात. पिंजऱ्यात बिबटय़ा अडकला की, गावकरी समाधानी होतात.

उसाच्या फडाची गोडी का?

पूर्वी जंगल व शेतीचा भाग या दरम्यान मोकळी जमीन (कॉरिडॉर) मोठय़ा प्रमाणावर होती. त्यात गवत व झुडपे असत. त्याला शिकारही सहजासहजी मिळत असे. पण १९९८ नंतरच्या काळात या मोकळ्या पडीक जमिनीत शेती केली जाऊ लागली. तेथे माणसांचा वावर जसा वाढला तसा तो असुरक्षित बनला. त्याला शिकारही मिळत नसे. त्यामुळे त्याने टप्प्याटप्प्याने अधिवास बदलण्यास सुरुवात केली. भीमाशंकर व अकोल्याच्या जंगलातून तो हळूहळू उसाच्या फडातून खालच्या भागात सरकू लागला. सुरुवातीला त्याच्याबद्दल लोकांना भीती होती. त्यामुळे माणूस व बिबटय़ा संघर्ष झाला. पण नंतर बिबटय़ाने बदललेल्या अधिवासातील पर्यावरणाशी जुळवून घेतले. आता पूर्वीसारखे लोक गावात राहत नाहीत. शिवारातील शेतरस्त्यांच्या कडेला वस्त्या टाकून ते राहतात. तेथे कुकूटपालन, शेळीपालन व गायी, म्हशींचा जोडधंदा करतात. त्यामुळे गावालगत शिवारातील मानवी वस्तीजवळच्या फडाला अधिक प्राधान्य दिले. उसात उंदीर, घुशी, रानमांजर, डुक्कर, मुंगूस, ससे हे प्राणी त्याला खाण्यासाठी उपयोगी पडू लागले. बिबटय़ाची मादी ही फडातच पिलांना जन्म देते. ते अधिक सुरक्षित असते. तिची उसात पिले आढळली की, शेतकरी तिकडे काही दिवस फिरकत नाही. अत्यंत सुरक्षित असा निवारा उसातच पिलांना मिळतो.

कायद्याबाबतचे ज्ञान वाढले

लोकांमध्ये वन्यप्राण्यांची हत्या केली की, शिक्षा होते. या कायद्याबद्दलचे ज्ञान वाढले आहे. तसेच बिबटय़ा आला की, वनखाते िपजरा लावते. तो पकडून नेऊन जंगलात सोडून देते. यावर विश्वास वाढीला लागला आहे. आता पाळीव प्राणी बिबटय़ाने खाल्ले की, वनखाते भरपाई देते. एका शेळीला ६ हजार, जखमी शेळीला ३ हजार, गायीच्या कालवडीला १० हजार रुपये मिळतात. बिबटय़ाने माणसांवर हल्ला केल्याच्या मोजक्याच घटना घडल्या असून त्यामध्ये त्यांना आíथक मदतही मिळते. तसेच वस्तीवर बिबटय़ा आला की, आरडाओरडा केला, फटाके वाजविले की, तो पळून जातो. त्याच्या पासून आता जिवाला फारशी भीती राहिलेली नाही, असा विश्वास लोकांमध्ये बळावला आहे. साहजिकच बिबटय़ांच्या हत्या होण्याचे प्रमाणही थांबले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्य़ात शंभराहून अधिक बिबटे हे उसाच्या फडात असल्याचा वनखात्याचा दावा आहे. त्याखेरीज पकडलेले काही बिबटे हे माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवाराकेंद्रात आहेत.

बछडे सुरक्षित

  • बिबटय़ाच्या मादीचे सव्वा ते दीड वर्ष या कालावधीत एक वेत होते. उसाच्या फडात झालेली दोन-तीन पिल्ले तरी हमखास जगतात. ज्या फडात बिबटय़ाने अधिवास केला आहे. त्याच्या दहा किलोमीटर परिसरात त्याचा वावर असतो.
  • मात्र कधीकधी तो वीस ते बावीस किलोमीटरच्या परिघातही असतो. हा वावर करताना तो काही खुणा सोडतो. विशेषत त्याची विष्ठा तो ठरावीक ठिकाणी करतो. त्याची घ्राणेंद्रिये ही अधिक तीव्र असतात. त्यामुळे तो त्याच्या अधिवासाच्या जागी हमखास येतो. पूर्वी जंगलात त्याला खाद्य मिळत नसे त्यामुळे त्याला लांबवर वावर करावा लागे.
  • पिल्ले जगण्याचे प्रमाण साहजिकच कमी असे. पिलांनाही सुरक्षितता मिळाली असून शेतकरी सापडलेली पिले मारून टाकण्याऐवजी वनखात्याकडे सुपूर्द करतात. अशा अनेक घटना जिल्ह्य़ात घडल्या आहे. हे देखील एक बिबटय़ांची संख्या वाढण्याचे कारण आहे.

उसाच्या फडात रमलेल्या बिबटय़ाशी आता माणूस आगळीक करत नाही. पूर्वीसारखी बिबटय़ा मारून टाकण्याची मानसिकता नाही. आता वनखात्याला कळविले जाते. माणसाचे बिबटय़ाशी एक चांगले सहजीवन सुरू झाले आहे. त्यामुळे दोघांतील संघर्षही थांबला आहे. काही भागात माणसांवर हल्ले झाले तरी आता त्याचा बाऊ तो करीत नाही. पाळीव प्राण्यांचे नुकसानही सहन करतो. माणसांच्या सहनशीलतेला सलाम करावा अशी स्थिती आहे.

संजय कडू, साहाय्यक वनरक्षक, नगर

नगर जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांत दहाहून अधिक बिबटय़ांचे मृत्यू झाले आहेत. काही बिबटे हे भक्ष्य किंवा पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडले. काहींना महामार्गावर मोटारीने उडविले. कोणीही हत्या केल्याची घटना पुढे आलेली नाही. वनखात्याने लोकांना विश्वास दिल्याने आता बिबटय़ांचे जगणे अधिक सुरक्षित बनले आहे.

जयलक्ष्मी, उपसंचालकवनविभाग, नगर