मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूरमध्ये अपघात झाला. हा अपघात तांत्रिक कारणामुळे की हलगर्जीपणामुळे झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हेलिकॉप्टर वीजेच्या खांबाला धडकल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने यात हलगर्जीपणाच अधिक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे सांगण्यात येत आहे.

फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूरमधील निलंगा येथे अपघात झाला. निलंगा येथून मुंबईला निघाले असताना ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर हवेचा झोका आल्याने पायलटने पुन्हा उतरवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी हेलिकॉप्टरचा काही भाग वीजेच्या खांबाला धडकला. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले तेथून काही अंतरावरच ट्रान्सफॉर्मर होता. या अपघातातून मुख्यमंत्री बचावले असले तरी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. हा अपघात तांत्रिक कारणामुळे की हलगर्जीपणामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात वीजेच्या खांबाला धडकल्याने हेलिकॉप्टर कोसळले, असे दिसते. हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी जे ठिकाण निवडले होते, तेच चुकीचे होते, असे बोलले जात आहे. तसेच उड्डाणापूर्वी पायलटने त्या ठिकाणाची पाहणी करणे अपेक्षित असते. पण तीही केली नसल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. दुसरी बाब म्हणजे अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावरच विजेचा ट्रान्सफॉर्मर होता. त्यामुळे अशा ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा करणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेलिपॅडसाठी हीच जागा ‘फिक्स’!

हेलिपॅडच्या ठिकाणाबाबतचा अहवाल जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महासंचालकांना पाठवण्यात येतो. त्यांच्या परवानगीनंतरच ठिकाण निश्चित केले जाते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हेलिपॅडची जागा निश्चित करण्यासाठी हीच प्रक्रिया पूर्ण केली होती. याच हेलिपॅडवर याआधी तिनदा मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. तसेच अन्य नेत्यांसाठीही तीच जागा निश्चित करण्यात येते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.