कोपर्डी घटनेच्या निषेधासह आपल्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने सोमवारी बुलढाण्यात उत्स्फूर्त मूकमोर्चा काढून अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन घडविले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या समाजातील युवतींनी मोर्चाच्या आयोजनामागील उद्देश विशद करून प्रचंड जनसमुदायासमोर आपल्या मागण्या मांडल्या. पुरुषांच्या बरोबरीनेच मातृशक्तीनेही लाखोंच्या संख्येने या मूकमोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ऐतिहासिक मोर्चाची नोंद केली. या विराट मराठा क्रांती मोर्चात नागरिकांचा महासागर उसळला होता.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी बुलढाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्य़ातच या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती. अतिशय शिस्तीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व जिजाऊंच्या लेकींनी केले. महिला भगिनी मोर्चाच्या अग्रस्थानी होत्या. मोर्चाचे प्रमुख व्यासपीठ जयस्तंभ चौकात उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या ११ मुली उपस्थित होत्या. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर मार्गावरील चावडी चौक, या परिसरात लाखोंच्या संख्येने केवळ मातृशक्तीची उपस्थिती होती. जिजामाता व्यापारी संकुलात शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सकाळी ८ वाजतापासून महिलांसह समाजातील नागरिकांनी मोर्चासाठी गर्दी केली. सकाळी ११ वाजतापासून व्यासपीठावरील मुलींनी मोर्चातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना माहिती देणे सुरू केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून जिजाऊ  वंदना झाली. लाखोंच्या जनसमुदायासमोर निवेदनाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. उरी येथील शहीद जवानांना व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने या मोर्चाची शांततेत सांगता झाली. मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे सहभागी झाले होते.

या मोर्चात १० हजार प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. मोर्चा भव्य व संपूर्णपणे शिस्तबद्ध होण्याची दक्षता समितीसह सर्वाच्या वतीने घेण्यात आली. संपूर्ण मोर्चाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. ५ ड्रोन कॅमेरे मोर्चात गिरटय़ा घालीत होते. विद्युत खांबांवर प्रभावी ध्वनिक्षेपके बसविण्यात आले होते. बुलढाण्यात ठिकठिकाणी एकूण ४० मोठय़ा स्क्रिन्स लावण्यात आल्या होत्या. या मोर्चात पोलिसांचीही कडक सुरक्षा व्यवस्था होती. मोर्चानंतर शहरात कचरा राहू नये, यासाठीची विशेष काळजीही घेण्यात आली. यानिमित्त जिल्ह्य़ातील काही खासगी शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुटी जाहीर केली होती. या मोर्चासाठी अगोदरच वाहतूक सोयीच्या दृष्टीने बदलण्यात आली. चिखली, मलकापूर, मलकापूर-चिखली, औरंगाबाद, धाड,  बुलढाणा मार्गात बदल करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, चिखली, धाड, अजिंठा जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस, चारचाकी व जडवाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले. मोर्चात होणारी गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली होती. विविध संघटनांकडून मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

विविध समाजाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला विविध समाजांनी पाठिंबा जाहीर केला. यात लोणार येथील मुस्लीम समाज, जैन समाज, नाभिक समाज, अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी समाज, दिगंबर जैन संघ, तेरापंथी जैन संघ आदींसह विविध समाजाच्या संघटनांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला होता.

((   बुलढाण्यातील मराठा क्रांती मूकमोर्चात लाखोंच्या संख्येने गर्दी उसळल्याने नवा उच्चांक पाहायला मिळाला. यात शिस्तीचे व एकीचे दर्शन घडले. मोर्चात आबालवृद्धांसह शेतकरी, महिला, युवक, युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. ))