राज्यात २१६  हुतात्मा स्मारके आहेत. या हुतात्मा स्मारकांची अवस्था बिकट आहे. ‘नाही दिवा, नाही पणती’ अशा अवस्थेत असणाऱ्या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीसह तेथील जागेचा योग्य उपयोग झाल्यास हुतात्मा स्मारकाची निश्चितच अभ्यास केंद्रे पर्यटनस्थळ बनतील, असे अनेकांना वाटते. राज्यात हुतात्मा स्मारके उभारण्यात आली तेव्हा सांगण्यात येत असल्यानुसार प्रत्येक हुतात्मा स्मारकाकडे दोन एकर किंवा त्यापेक्षा कमी जागा आहे. या ठिकाणी हुतात्मा स्मारके उभारण्यात आली तेथे एक इमारतही उभी आहे. आरोंदा व मालवणमध्ये हुतात्मा स्मारके उभी आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे.
माजी आमदार तज्ज्ञ स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्मा स्मारकांची देखभाल किंवा या हुतात्मा स्मारकांसाठी योजना बनावी म्हणून सतत पाठपुरावा केला. त्यांची कायमस्वरूपी देखभाल ग्रामपंचायतीकडे द्यावी. त्यासाठी दर वर्षी एकरकमी अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
राज्यात हुतात्मा स्मारकांची संख्या पाहता, तसेच त्या हुतात्मा स्मारकाजवळ असणारी जमीन पाहता राज्य शासनाला विकासाची योजना राबविता येईल. या हुतात्मा स्मारकाची बांधणी, हुतात्म्यांची माहिती, त्यांचे कार्य, असा माहितीपट ठेवावा, तसेच या स्मारकांच्या ठिकाणी येणाऱ्या अभ्यासक किंवा इतिहासप्रेमींना बसण्यासाठी एखादे गार्डन उभारावे. शिवाय देखभालीसाठी एखादी समिती नेमावी, असे बोलले जाते.
या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था गौरवशाली परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा किंवा सुसज्ज स्मारके ठेवण्याचा विचार राज्य सरकारने करावा, असे स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नातेवाईक व इतिहासप्रेमींना वाटते.
राज्यातील या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी इतिहासप्रेमी अभ्यासकांना काही माहितीही उपलब्ध करून ठेवल्यास भावी पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो पण हुतात्मा स्मारकाची आजची केविलवाणी परिस्थितीकडे शासनाने लक्ष देण्यासाठी मागणी आहे. स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या या संदर्भात शासनाकडे मागण्या आहेत त्याचे निवेदनही दिले आहे.
पर्यटनासाठी राज्य सरकार विविधांगी विचार करीत आहे त्यामुळे इतिहासप्रेमी, अभ्यासक पर्यटकांसाठी हुतात्मा स्मारके कशी पर्यटनस्थळे निर्माण होऊ शकतात. त्याचा शासनाने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहेत.