शिरोळ तालुक्यातील कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक, सहकारी संस्थांचे आधारस्तंभ, समाजवादी चळवळीतील बिनीचे शिलेदार, माजी आमदार डॉ. सा.रे.पाटील यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून शिरोळ तालुक्यात धक्का बसला. सहकारी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याच्या प्रतिक्रिया सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. समाजवादी चळवळीला धक्का बसल्याचे त्या गटातील कार्यकर्त्यांनी सांगितले. तर, सामान्य कार्यकर्ता व शेतकऱ्यांनी आपल्या जीवनात गोडवा आणणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याचे दुख व्यक्त केले. त्यांच्या निधनामुळे जयसिंगपूर शहरासह संपूर्ण शिरोळ तालुक्यात बंद पाळण्यात आला.
शिरोळ तालुका व सा. रे. पाटील यांचे अविभाज्य नाते होते. कृष्णा-पंचगंगा नदीकाठी असलेला शिरोळ तालुक्याचा भाग ओसाड होता. या भागात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कारखान्याचे संस्थापक दिवंगत खासदार दत्ताजीराव कदम, दिवंगत खासदार आबासाहेब खेबुडकर यांच्या मदतीमुळे सा.रे.पाटील यांना कारखाना उभारता आला. कारखान्याच्या अल्प काळात प्रगतीही केली. कारखान्याला मिळालेले पन्नासहून अधिक देश-राज्य पातळीवरील पुरस्कार यशाचे साक्षीदार ठरले आहेत. १८ पाणी योजना राबवून सुमारे ४० हजार एक्कर जमीन ओलिताखाली आणून कृषी औद्योगिक क्रांती होण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार होता. यामुळे सा.रे.पाटील यांना दैवत मानणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज अश्रू साचले हाते. श्रीवर्धन बायोटेक हरित गृह, मूळ गाव जांभळी, निवासस्थान असलेले जयसिंगपूर व कार्यक्षेत्र असलेला दत्त कारखाना येथे  सहकारातील भीष्माचार्याला अखेरची मानवंदना देण्यासाठी ग्रामीण भागातील अलोट गर्दी जमली होती.
सा.रे.पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. तथापि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने समाजवादी, डावे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रेही मोठय़ा प्रमाणात आले होते. खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, कर्नाटकचे मंत्री प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री विनय कोरे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार शरद पाटील, वैभव नायकवडी, माजी आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के.पी.पाटील, चिमन लोकूर, भरत लाटकर आदींनी आदरांजली वाहिली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक संदेशात,‘ सामान्य शेतकरी ते आमदार असा प्रवास करणारे सा.रे.पाटील हे सर्व व्यापक विचार करणारे उत्तुंग व्यक्तिमतत्व होते,’ असे म्हटले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी, समाजवादी चळवळीतील सा.रे.पाटील हे बुलंद व्यक्तिमत्त्व होते. सहकार क्षेत्रात संस्कारशील वर्तन त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे घडले, असे सांगितले. एस.एम.जोशी यांच्या पुण्यतिथी दिनीच सा.रे.पाटील यांचे निधन झाले असून गुरू-शिष्यांचा मृत्यू एकाच दिवशी व्हावा हा योगायोग असल्याचेही त्यांनी सांगितले.
सा.रे.पाटील यांनी वीस वर्षांपूर्वी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी देहदानाची तयारी केली. त्यानुसार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाíथव मिरजेकडे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय इस्पितळातील सूत्रांकडे पाíथव सोपवून अनुयायी जड अंत:करणाने परतले.