कर्नाटक शासनाने प्रचंड दडपशाही करीत रविवारी येळ्ळुर गावातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळुर’ हा फलक काढून टाकला. या प्रकारास विरोध करणाऱ्या मराठी भाषकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यामध्ये लहान मुले, स्त्रिया यांच्यासह ५० हून अधिक मराठी बांधव जखमी झाले आहेत. ७ जणांना अटक करण्यात आली आहे. येळ्ळुर गावामध्ये  जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक शासनाने केलेल्या दडपशाही व लाठीमारीचा निषेध नोंदवला आहे. सायंकाळी कर्नाटकचे पोलीस महानिरीक्षक हेमंत िनबाळकर यांनी एकीकरण समिती, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसमवेत बठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी पोलिसांकडून कसलाही अतिरेक केला जाणार नाही,असे आश्वासन दिले.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी कर्नाटक प्रशासनाने येळ्ळुर गावातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळुर’ नावाचा फलक काढून टाकला होता. त्याला प्रतिउत्तर देत अवघ्या २४ तासात मराठी भाषकांनी शनिवारी हा फलक पुन्हा उभा करून मराठी बाण्याचे दर्शन घडवले होते. यामुळे कर्नाटक शासनाचा तिळपापड झाला. त्यांनी फलक काढून टाकण्याच्या दिशेने शनिवारी रात्रीपासूनच हालचाली सुरू केल्या. प्रचंड पोलीस फौजफाटा घेऊन कर्नाटक पोलीस व प्रशासन येळ्ळुर गावात दाखल झाले होते.
रविवारी गावात सकाळपासूनच प्रचंड तणाव जाणवत होता. साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रशासन व पोलिसांनी शनिवारी उभा केलेला फलक काढून टाकला. त्यामुळे दुखावलेल्या मराठी भाषकांनी आवाज उठवण्यास सुरूवात केली. पण कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार करून मराठी भाषकांना घटनास्थळावरून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. तरीही आबालवृद्ध मराठी भाषक प्रतिकार करत होते. पोलिसांनी मुले, महिला असला कसलाही भेदभाव न करता जोरदार  लाठीमार सुरू ठेवला. यामध्ये ५० हून अधिक लोक जखमी झाले. संतप्त पोलिसांनी मराठी भाषकांची घरे लक्ष केली. शेकडो घरे, दरवाजे, खिडक्या यांची प्रचंड नासधूस केली. वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. शिवाय दहशत बसवण्यासाठी गावामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कर्नाटक प्रशासनाच्या दडपशाही विरोधात मराठी भाषकांमध्ये असंतोष खदखदत राहिला.
दरम्यान, सायंकाळी बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत िनबाळकर यांनी येळ्ळुरला भेट देऊन पाहणी केली. एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, अरिवद पाटील, माजी आमदार मनोहर किलेकर, महापौर महेश नाईक, माजी महापौर मालोजी आष्टेकर, अप्पासाहेब पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची बठक घेतली. या वेळी एकीकरण समितीने पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. तर या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून कर्नाटकच्या दडपशाही विरूद्ध आवाज उठवावा, अशी मागणी मालोजी आष्टेकर यांनी केली आहे.

फलक फोडल्याप्रकरणी एसटी बस फोडल्या
कर्नाटकातील येळ्ळूर (जि. बेळगाव) येथील ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ हा फलक उच्च न्यायालयाच्या आदेशाने कर्नाटक पोलिसांनी फोडला. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरातील मुख्य बसस्थानकात आलेल्या कर्नाटकच्या पाच एसटी बसेस फोडल्या होत्या. यामध्ये कर्नाटक डेपोच्या बसेसचे अडीच लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.