भाजप नेते तथा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांनी त्यांच्या शिशु हॉस्पिटलमध्ये रिमोटच्या माध्यमातून डास मारणाऱ्या रॅकेटने २ लाख ६७ हजारांची वीज चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील बहुसंख्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्सिग होम व क्लिनिकमध्ये अशा प्रकारची वीजचोरी धडाक्यात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महावितरण नागपूर परिमंडळातील चंद्रपूर विभागाने येथील जटपुरा गेटजवळील डॉ. खान यांच्या शिशु हॉस्पिटलमध्ये वीजचोरी उघडकीस आणली. ही वीजचोरी रिमोटने होत होती व ते रिमोट शिताफीने मच्छर मारण्याच्या रॅकेटमध्ये लपविण्यात आले होते. परंतु महावितरणच्या भरारी पथकाच्या अनुभवी अभियंत्यांसमोर ही चोरी लपून राहू शकली नाही. रिमोटव्दारे होणाऱ्या या वीजचोरीमधून १८ हजार २५६ युनिट्ची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. वीज चोरीचे २ लाख ६७ हजार व  दंडाची रक्कम ४० हजार रुपये असा जबरदस्त धक्का डॉ. एम. जे. खान यांना बसला आहे. महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाशिनकर व त्यांच्या चमुने ही कारवाई केली.  रिमोट लपविण्यात आलेली मच्छर मारण्याची रॅकेट जप्त करण्यात आली आहे.
महावितरणव्दारे वेळोवेळी वीजचोरी विरोधात अशी कारवाई करण्यात येत असते. तरी सुध्दा वीजचोरी होत असते व शेवटी वीजचोरी पकडल्या जावून मानहानीचा तसेच वीजचोरीच्या रकमेचा एकत्रित भरावा लागणारा दंड अशी दुहेरी शिक्षा वीजचोरास सोसावी लागते.
नागरिकांनी अशाप्रकारच्या वीजचोरीपासून परावृत्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजचोरी होत असल्यास महावितरणकडे तक्रार करावी तसेच वीजचोरी कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असून वीजचोरी कळविणाऱ्या महावितरणतर्फे बक्षीस देण्यात येते. दरम्यान, या संदर्भात अधिक माहितीसाठी अधीक्षक अभियंता अर्चाना घोडेस्वार यांच्याशी संपर्क साधला असता ही वीजचोरी मोठी व अतिशय वेगळय़ा पध्दतीने करण्यात येत होती. सध्या डॉ. खान यांच्या हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून उद्या शुक्रवारी त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलताना दिली.