राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्याचा निर्णय भाजपा आणि शिवसेनेच्या राज्य नेतृत्वाने जाहीर केला असला तरी जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नगर परिषद निवडणुकांसाठी युतीबाबत अनश्चिततेचे वातावरण आहे.

या संदर्भात आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश मानून येत्या चार दिवसात जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि एका नगर पंचायत निवडणुकीसाठी युती केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला, ता भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी मात्र, आपल्याला याबाबत राज्याच्या नेतृत्वाकडून काहीही सूचना आल्या नसल्याचे सांगत आता तसे होणे अव्यवहार्य असल्याचे सूचित केले.

राज्यात सत्तेवरअसलेल्या या दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांच्या वेळी परस्परसामंजस्याने जागावाटप करून युतीच्या बॅनरखाली निवडणुका लढवल्या. पण गेल्या पाच वर्षांत या दोन पक्षांमधील अंतर सातत्याने वाढतच गेले असून या वेळी या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दोन्ही बाजूनी देण्यात आला होता. दोन्ही पक्षांच्या राज्य नेतृत्वानेही त्यावर आक्षेप न घेत जणू या धोरणाला मूक संमती दिली होती. त्यामुळे या पक्षांच्या जिल्हा व तालुका पातळीवरील नेत्यांनी त्यानुसार रणनीती आखत निवडणुकांसाठी आपापले उमेदवार निश्चित केले. त्याचबरोबर अन्य पक्षांमधील प्रभावी कार्यकर्त्यांना उमेदवारीची लालूच दाखवत आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न यशस्वीपणे करण्यात आले. त्यापैकी काहीजणांना त्यानुसार उमेदवारीही देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांच्या बहुसंख्य  उमेदवारांनी आजअखेर उमेदवारी अर्ज दाखलही केलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य पातळीवरील नेत्यांच्या इच्छेखातर युती टिकवण्यासाठी आता अचानक त्यापैकी जवळजवळ ५० टक्के उमेदवारांना माघार घ्यायला लावणे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांसाठी अतिशय अवघड गोष्ट झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्रांमध्ये सेनेचे वर्चस्व असल्यामुळे जागा वाटप करायचे झाल्यास सेनेचा वरचष्मा राहील, हे उघड आहे. तसेच या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्यास गेल्या वेळपेक्षा जास्त चांगल्या कामगिरीचा भाजपाला विश्वास आहे. अशा केवळ राज्य नेतृत्वाच्या इच्छेखातर युती झालीच तर अनेक ठिकाणी  ‘मैत्रीपूर्ण लढतीं’ची जास्त शक्यता आहे.