जाहीर सभांमधून ‘नॅचरली करप्ट पार्टी’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतात. त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलण्यास ते थकताना दिसत नाही. परंतु त्यांचेच सहकारी मात्र आपल्या पक्षाच्या धोरणांना तिलांजली देताना दिसत आहे. ‘सत्तेसाठी कायपण’ या एकमेव ध्येयातून हे सर्व आरोप विसरून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपने राष्ट्रवादीशी युती केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची राजकीय महत्वकांक्षा या भूमिकेमागे असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण आहेत. या जागांसाठीच भाजपने राष्ट्रवादीशी युती केली आहे. ही युती व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी खास वरिष्ठांची परवानगी घेतल्याचे समजते. भाजप-राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असली तरी सोलापुरात मात्र दोन्ही पक्षाचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकत आहेत. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून मोठ्या थाटामाटात या युतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. विशेष म्हणजे या युतीचे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी कौतुक केले आहे. ते स्वत:ही प्रचार शुभारंभास उपस्थिती होते.

उत्तर सोलापूर तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे वर्चस्व आहे. यातील नान्नज गणातील ९ गावांपैकी ७ गावांवर माने यांची सत्ता आहे. उर्वरित दोन गावांवर राष्ट्रवादीचे नेते व सुभाष देशमुख यांचे नात्याने मामा असलेले बळीराम साठे यांची सत्ता आहे. सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. विधानसभा निवडणुकीत देशमुख यांनी माने यांचा पराभव करत या मतदारसंघात भाजपला विजय मिळवून दिला होता. माने हे यापूर्वी याच मतदारसंघातून निवडून आले होते. भविष्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय फायद्यासाठी देशमुख यांनी ही चाल खेळल्याचे समजते.
सुभाष देशमुख हे अनेकवेळा आपल्या भाषणातून शरद पवार अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. परंतु, केवळ राजकीय महत्वकांक्षेसाठी त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतही देशमुख यांनी आपला मुलगा रोहन याला उस्मानाबाद मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभा केले होते. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड हे विजयी झाले होते. परंतु त्यावेळी शिवसेना व भाजपमधील संबंध ताणले गेले होते. एकीकडे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर व कारभारावर टीका करायची व दुसरीकडे त्यांच्याशी युती करायची हे धोरण भाजपने सुरू ठेवल्याचे दिसते.