लातूर तालुक्यातील तांदूळवाडी गावच्या शिवारात सोमवार व मंगळवार असे दोन दिवस गारपीट व जोरदार पावसाने प्रचंड नुकसान झाले. प्रशासन मात्र ढिम्म असून, केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहे.
लातूरपासून १८ किलोमीटर अंतरावर तांदूळवाडी गावावर सोमवारी रात्री आभाळ कोसळले. संपूर्ण रात्रभर भिजपाऊस व गारपीट झाली. मंगळवारीही दुपारी साडेबारा ते संध्याकाळी पाचदरम्यान धो धो पाऊस पडला. पावसामुळे शिवारात सगळीकडे पाणीच पाणी साचले. शेतीचे बांध फुटले. सुमारे २ फूट खोल काळी माती वाहून गेली. शेतातील लहान वासरे या पावसामुळे दगावली. या प्राण्यांच्या हाडांचे सापळे इतस्तत: पडल्याचे मन हेलावून टाकणारे चित्र शिवारात शनिवारी दिसून आले. माजी सरपंच भागवत सोट यांच्या घराची सुमारे ५० फूट काँक्रीटची संरक्षक िभत पावसाच्या पाण्याच्या रेटय़ामुळे भुईसपाट झाली. गावातील अनेक घरांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले. mh01तांदूळवाडीपासून ५ किलोमीटर अंतरावरील भुईसमुद्रा गावात सिंचन विभागाचे मांजरा प्रकल्प कार्यालय आहे. येथे पर्जन्यमापक आहे. त्यामुळे पावसाची नोंद झाली. सोमवारी ४२, तर मंगळवारी ४६ मिमी पावसाची नोंद येथे झाली. तांदूळवाडीत पर्जन्यमापक नसल्यामुळे गावकऱ्यांनी कितीही ओरडून सांगितले, तरी त्यांच्या गावात नेमका किती पाऊस झाला, हे प्रशासन सांगू वा कळू शकणार नाही. सुमारे दीड हजार लोकवस्तीच्या या गावात १४ एप्रिलला पडलेल्या पावसाची भीतिदायक आठवण अजूनही लोकांना त्रासून सोडते आहे. याआधी असा मोठा पाऊस कधीही अनुभवला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने शेतीचे पंचनामे करण्याचा सोपस्कार पूर्ण केला. सरकारच्या नियमानुसार योग्य ती मदत येईल, असे सांगून महसूल विभागाने हात झटकले. गावातील घरांच्या पडझडीकडे मात्र महसूल विभागाने लक्ष दिले नाही. कारण तशी तरतूद महसूल विभागात नसल्याचा खुलासा यासाठी करण्यात आला.
गावातील प्रगतिशील अल्पभूधारक शेतकरी अंगद गोमचाळे यांनी या वर्षी २० गुंठे शेडनेट उभारले होते. पहिल्याच हंगामाची सिमला मिरची जोरदार आली. मात्र, गारपिटीमुळे शेडनेटचे मोठे नुकसान झाले. शेडनेटवर गारा पडल्यामुळे मिरचीचेही मोठे नुकसान झाले.
शिवारातील सुमारे ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे नुकसान झाले. रब्बी ज्वारी, भाजीपाल्याची शेती, कडबा पूर्ण वाहून गेले. गावालगत नाला सरळीकरणाचे काम ग्रामस्थांनी सुरू केले होते.
नाला तुडुंब भरलाच. मात्र, या कामासाठी ठेवलेला काँक्रीट मिक्सरही पाण्यात बुडाला. नाल्याकाठच्या विहिरी काठोकाठ भरल्या. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागझरी जलाशयात एकाच रात्रीत सुमारे २.५ घनमीटर नवीन पाणी आले. लातूरकरांना याचा आनंद झाला. मात्र, हे पाणी आले कुठून? याचा प्रशासनाने फारसा विचार केला नाही.

पर्जन्यमापक यंत्र गावांमध्ये हवे
लातूर तालुक्यातील मंडलाच्या गावात महसूल यंत्रणेतर्फे पर्जन्यमापक ठेवण्यात आले आहेत. तांदूळवाडी गाव गातेगाव मंडलअंतर्गत येते. गातेगावला अत्यल्प पाऊस झाल्याने तांदूळवाडीकरांच्या प्रश्नांकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्याशिवाय गावचे प्रश्न प्रकाशात येणारच नाहीत. तांदूळवाडीकरांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने, तसेच लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांनी प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.