चिपळूण येथे गेल्या जानेवारीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी माजी मंत्री भास्कर जाधव यांनी रोखलेला २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे सूचित करुन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण संपले नसल्याचे दाखवून दिले.दरम्यान, साहित्य संमेलनाला सुमारे सहा महिने उलटल्यानंतरही संयोजकांकडून अद्याप त्याबाबतच्या खर्चाचा हिशेब जाहीर करण्यात आलेला नाही.
चिपळूण येथे ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११ ते १३ जानेवारी या काळात साजरे झाले. या संमेलनासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातर्फे २५ लाख रुपये देण्याचा ठराव मंडळाच्या बैठकीत बिनविरोध संमत करण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पण, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी रायगडचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांची निवड झाल्यामुळे जाधव कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी हा निधी संयोजकांना मिळणार नाही, याची काळजी घेतली. गेल्या महिन्यात जाधव यांच्या जागी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची पालकमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर संमेलनाचे संयोजक असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विश्वस्तांनी या निधीसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. संमेलनाचा आर्थिक खर्च जास्त झाल्यामुळे या निधीची अजूनही गरज असल्याचे संयोजकांतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांना पटवून देण्यात आले. त्यासाठी आवश्यक नव्याने प्रस्ताव देण्याची तयारी दर्शवली. या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण पूर्वीपासून चालत आले आहे. त्यामध्ये पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव एका बाजूला आणि नवीन पालकमंत्री सामंत, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम इत्यादी मंडळींचा विरोधी गट अशी स्थिती राहिली आहे. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जाधव आणि सामंत या दोघांनीही नव्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन सहमतीचे राजकारण करणार असल्याचे सांगितले होते. पण माजी पालकमंत्र्यांनी रोखलेला निधी देण्याचे संकेत देत सामंत-निकम गटाने पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची चुणूक दाखवली आहे.