प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील उपाख्य ‘पुपाजी’ यांच्या निधनाने धुळ्यातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील राहत्या घरी पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. साहित्यप्रेमींमध्ये ‘पुपाजी’ म्हणून ते प्रसिद्ध होते. मंगळवारी देवपूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवसाहित्यिकांसाठी प्रेरणास्थान असलेले पाटील यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पाटील यांचा जन्म ३ मार्च १९२८ रोजी जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता.पारोळा) येथे मामांच्या घरी झाला. त्यांचे मूळ गाव ढेकू (अमळनेर, जिल्हा जळगाव) हे आहे. सातवीपर्यंत बहादरपूरला शिक्षण घेतल्यावर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून १९४६ मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे ते पुण्याला गेले. फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांच्या कविता ‘सत्यकथा’मधून प्रकाशित होऊ  लागल्या. त्यांनी पुढे ‘जनशक्ती’मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील विद्यालयांमध्ये मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळली. कला शाखेची पदवी घेतल्यावर १९६१ मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९४७ पासून काव्यलेखन करणाऱ्या पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह ‘तळ्यातल्या सावल्या’ १९७८ मध्ये प्रकाशित झाला. त्यास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी साडेपाच वर्षे काम केले. कवितेसाठी वाहिलेले ‘कवितारती’ हे द्वैमासिक त्यांनी १९८५ मध्ये सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. अनेक वर्तमानपत्रांमधून त्यांनी साहित्यिक व सामाजिक विषयांवर लेखन केले. ‘तुकारामाची काठी’ आणि निवडक मराठी कवितांचे मर्म उलगडून दाखविणारे ‘अमृताच्या ओळी’ ही त्यांची दोन पुस्तके अशा सदर लेखनांचा संग्रह आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते. १९८५ मध्ये प्रजासत्ताकदिनी झालेल्या अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते. धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असताना त्यांनी युवा साहित्यिकांना प्रेरणा दिली. कवी बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले. विं. दा. करंदीकर, रणजित देसाई आदी साहित्यिकांसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध होते. कवी कुसुमाग्रज हे त्यांचे प्रेरणास्थान होते. साहित्य क्षेत्रात धुळ्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या अशा ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनामुळे  साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू