जिल्हय़ात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे. जवखेडे खालसा येथील हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. यातील आरोपींना तातडीने अटक न केल्यास मुंबईत राज्यपालांना घेराव घालण्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दिला.
जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी नगरमध्ये दलित अत्याचार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पोटभरे बोलत होते. या वेळी अशोक गायकवाड, किसन चव्हाण, सुनील उमाप, अरुण जाधव, सुनील क्षेत्रे, अजय साळवे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
नगर जिल्हय़ात वारंवार दलितांवर अत्याचार होत असल्याने जिल्हा अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, तपास त्वरित न लागल्यास विधिमंडळाच्या अधिवेशनातही आंदोलन केले जाईल, अत्याचार रोखण्यासाठी सर्व दलित संघटनांनी एकत्र यावे, सरकारनेही दलितांना संरक्षणासाठी शस्त्रे द्यावीत, प्रक्षोभक भाषणे करून तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पोटभरे यांनी केली.
दलित तरुणांनी जातीयवाद्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन सुनील उमाप यांनी केले.