जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी कितीही विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जैतापूर प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प असून, तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्यच केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील सत्तेत भाजपसोबत सहभागी असलेल्या शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध आहे. त्यापार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, जैतापूर प्रकल्प रद्द करण्यासारखी आता स्थिती नाही. चार वर्षांपूर्वी कोणी विरोध केला असता, तर त्याचा विचार करता आला असता, मात्र, आता हा प्रकल्प रद्द करता येणार नाही. कोणी किती विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.