‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांमध्ये असलेले हेवेदावे, भेदभाव, छेडछाड, रडगाणी, भांडणतंटा, आरडाओरड आणि ताणतणाव इत्यादी नित्याचेच झाले आहे. किंबहुना हे सर्व प्रकार या शोचा टीआरपी वाढविणारे असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. घरातील कॅप्टन अलीने काणतेही सबळ कारण न देता प्रणितला नामांकित केल्याने घरातील सर्व सदस्यांचा त्याच्यावर रोष आहे. त्याच्या या वागण्याने ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरणत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच घरातील अन्य सदस्य सोनाली राऊतशी अलीने गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. रात्री उशिरा उपेन पटेल आणि सोनाली राऊतबरोबर बसलेला असताना अली ब्लॅंकेटच्या खालून सोनालीच्या गुढघ्याला स्पर्श करून तिची छेड काढतो. अलीच्या या गैरवर्तनाने प्रचंड खवळलेली सोनाली त्याला चांगलेच खडसावते. छेड काढणाऱ्या अलीच्या छातीत सोनाली लाथेचा प्रहार लागावते आणि पुन्हा असे न करण्याची सक्त ताकीद देते. आपण फक्त थोडीशी मजा-मस्ती करत असल्याचे सांगत अली समजाविण्याचा प्रयत्न करतो, परंतु अलीच्या या गैरवर्तनासाठी ‘बिग बॉस’ त्याला कठोर शासन करतो.