हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायकांच्या शंभर कोटींचे क्लब सुरू झाल्यानंतर नायिकांच्या बाबतीतही यशाची फुटपट्टी म्हणून याच कोटींच्या आकडेवारीने मोजमाप केले जाऊ लागले आहे. एखाद्या चित्रपटाने तिकीटबारीवर शंभर कोटींची कमाई केल्यानंतर साहजिकच त्या चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या जोडीची गणना पहिल्या पंक्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीची संबंधित चित्रपटात सुमार भूमिका असली तरी तिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील होते. याचा मोठा फटका कंगना राणावत, विद्या बालन यांच्यासारख्या चांगल्या अभिनेत्रींना बसला आहे. कित्येक चांगले चित्रपट असूनही शंभर कोटींपासून लांब असलेल्या ‘क्वीन’ कंगनाला अखेर ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ चित्रपटाच्या यशाने साथ दिली.

‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ हा चित्रपट या वर्षीचा तिकीटबारीवर शंभर कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट ठरला आहे आणि याच चित्रपटाने कंगना राणावतला शंभर कोटींची नायिका म्हणून सिद्ध केले आहे. याआधी कंगनाने ‘फॅशन’, ‘तनु वेड्स मनु’, ‘क्वीन’सारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले होते. मात्र, केवळ या चित्रपटांना शंभर कोटींचा गल्ला जमवता आला नाही. त्यामुळे कंगनाला त्यात स्थान मिळाले नव्हते. आजघडीला या यादीत दीपिका पदुकोणचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. तिच्या नावावर पाच शंभर कोटींचे चित्रपट आहेत. ज्यात केवळ तिच्यासाठी ओळखल्या गेलेल्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’सारख्या चित्रपटाचाही समावेश आहे. अन्य चित्रपटांमध्ये अर्थातच खानांबरोबर केलेले चित्रपट मग तो शाहरूखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ यांचा समावेश आहे. दीपिकानंतर करिनाच्या नावावर पाच चित्रपट आहेत. अक्षयकुमार आणि सलमान खान यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटांचे फलस्वरूप सोनाक्षी सिन्हाच्या नावावरही पाच चित्रपट जमा आहेत.
त्याखालोखाल कतरिना कै फ आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावावर चार शंभर कोटींचे चित्रपट जमा आहेत. अगदी जॅकलिन फर्नाडिससारख्या अभिनेत्रीच्या नावावरही तीन शंभर कोटींचे चित्रपट आहेत. नव्याने आलेल्या गँगमध्ये सोनम, अनुष्का, श्रद्धा कपूर, अलिया भट यांच्या नावावर एकेक चित्रपट जमा आहे. पण, दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कंगनाला मात्र या यादीत स्थान मिळवता आले नव्हते. नाही म्हणायला ‘क्रिश ३’ने शंभर कोटींच्या वर कमाई केली होती. मात्र, त्याचे श्रेय हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांना मिळाले. तर विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ चित्रपटाची उडी शंभर कोटींसाठी थोडक्यात कमी पडली. या चित्रपटाने ९७ कोटी रुपयांची कमाई केली होती. ही सगळी कसर आनंद राय दिग्दर्शित कंगनाची दुहेरी भूमिका असलेल्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ या चित्रपटाने भरून काढली. आठवडय़ाभरात या चित्रपटाने १०१.६७ कोटींचा गल्ला जमवला असून अजूनही चित्रपट गर्दी खेचतो आहे. उशिरा का होईना बॉलीवूडच्या फुटपट्टीत कंगनाही ‘क्वीन’ ठरली आहे.