अजय देवगण आणि इमरान हाश्मीचा यांच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाचा मुहूर्त पक्का झाला आहे. अजय देवगणने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली. यापूर्वी हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या. मात्र अजयने आपल्या अगामी चित्रपटाला सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे आता स्पष्ट झाले. १ सप्टेबर २०१७ रोजी अजयचा आगामी चित्रपट प्रदर्शित होईल.

या चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत बेबी डॉल सनी लियॉनी आयटम साँग करणार असल्याचे वृत्त यापूर्वी चर्चेत आले होते. या चित्रपटात दोघंही एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. या गाण्याचे शुटिंग मुंबई किंवा राजस्थानमध्ये होणार असल्याचे देखील बोलले जात होते. ‘बादशाहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथारिया करणार आहेत. इमरान हाश्मी अजय देवगणसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटापूर्वी हे दोन्ही कलाकार ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटामध्ये एकत्र आले होते. हा चित्रपट पुढच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, असा विश्वास चित्रपटातील कलाकारांना वाटत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि इलियाना डिक्रूज हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत.

यापूर्वी इमरान हाश्मी ‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’ या चित्रपटात दिसला होता. इमरान हाश्मीची मुख्य भूमिकेतील या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे पुढील वर्षी अजयसोबतच्या चित्रपटाकडून इमरानला आशा आहे. ‘अझर’ या चित्रपटानंतर इमरान हाश्मी ‘राज रीबूट’मध्ये दिसला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी एक म्हणजे करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि दुसरा चित्रपट म्हणजे अजय देवगणचा ‘शिवाय’.  अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत पिछाडीवर पडला होता.  ‘शिवाय’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण बल्गेरिया, हैदराबाद आणि उत्तराखंडमध्ये करण्यात आले होते. अभिनेते दिलीप कुमार यांची नात साएशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.