दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटातून कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे त्रिकूट दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी जागविण्यास सज्ज झाले आहे. या चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्दांना सेन्सोर बोर्डाने कात्री लावल्याचे समजते. यामध्ये अभिनेत्री कंगनाला खोटारडी संबोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दासह आणखी काही शंब्दांचा समावेश होता. आक्षेपार्ह शब्दांमध्ये बदल केल्यानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘यूए’ प्रमाणपत्र दिले आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर आता  चित्रपटामध्ये ‘रास्कल’ हा शब्द ऐकायला मिळणार आहे. तसेच कंगना रनौतला खोटारडी म्हणून  (झूठी) असा शब्दप्रयोग करण्यात आल्याचे प्रेक्षकांना ऐकायला मिळेल.  गेल्या काही दिवसांपासून कंगना ‘रंगून’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची चर्चा थांबते न थांबते तोच चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला होता. ‘रंगून’ या बहुचर्चित ट्रेलरमधून ‘जानबाज जुली’च्या भूमिकेत दिसणारी कंगना अनेकांचेच लक्ष वेधताना दिसेते. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे.

[jwplayer 6MSZQPVA]

अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाची बरोबरी करत असतानाच ट्रेलरमध्ये असणारे कंगनाचे संवाद आणि ते संवाद म्हणण्याचा अंदाजही प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. गतकाळातील मुंबई नगरीची झलकही  ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरसह या चित्रपटातील ‘ब्लडी हेल’ या गाण्याची चाल आणि त्या गाण्यावर थिरकणारी कंगना अनेकांचेच लक्ष वेधत आहे. घोडेस्वारी करणारी, हातात हंटर घेऊन येणारी कंगना आणि तिची अदा सर्वांनाच घायाळ करत आहे. विशाल भारद्वाज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्यामुळे ‘रंगून’च्या निमित्ताने प्रेक्षकांनाही एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहता येणार आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या चित्रपटात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, ग्लॅम्बर आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[jwplayer AedMl0xy]

या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी बॉलिवूड ‘राजकुमार’ शाहिद कपूर आणि बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत यांच्यात  शीतयुद्ध रंगल्याची देखील चांगलीच चर्चा ऐकायला मिळाली होती. कंगना रणाौत दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कामामध्ये दखल घेत असल्यामुळे सेटवर निराशेचे वातावरण असल्याची बोलले जात होते. शाहिद आणि कंगना दोघांनी हे वृत्त फेटाळून लावले होते.