सोनाली कुलकर्णी

माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होते. गेल्या तीस वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. माझ्या आजोबांनी ही परंपरा सुरु केली होती. त्यानंतर माझे बाबा घरात मोठे असल्यामुळे त्यांनी परंपरा सुरु ठेवली. आमच्या घरी दरवर्षी दहा दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात. पण आता सगळ्यांच्या घरी गणपती आणायला सुरवात केली आहे. माझ्या सर्वच काकांकडे गणपती आणला जातो. कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवस बाप्पाची स्थापना करतात. मात्र, आमच्या पुण्यातल्या घरी परंपरागत दहा दिवस बाप्पाची पूजा केली जाते.
बाप्पाची बसलेली आणि मोहक अशी मूर्ती घरी आणली जाते. आमच्याकडे एक प्रथा आहे. दरवर्षी आम्ही गेल्यावर्षीच्या मूर्तीचे विसर्जन करतो. आता यावर्षी आणलेली मूर्ती आम्ही देवघरात ठेवणार आणि तिची वर्षभर पूजा करणार. तर गेल्यावर्षी स्थापन केलेल्या मूर्तीचे यंदा विसर्जन करणार. यामागचं कारण काय आहे ते मला नक्की माहित नाही मात्र आमच्याकडे गेली अनेक वर्षे असेच केले जाते. वर्षभर बाप्पाची मूर्ती घरात असावी ही परंपरा आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पहिल्या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. बाकीचे दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा आणि गोडाचा नैवेद्य दाखविला जातो. बाप्पासाठी अगदी पारंपारिक सजावट  केली जाते. पेपर, थर्माकॉलचा वापर अजिबात केला जात नाही. आता ब-याच रुपातल्या गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात. पण बाप्पाची मूर्ती साधीच असावी असं मला वाटतं. माझ्या मते ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा परंपरेला फॉलो केलं तर ते जास्त चांगल राहिल.

शब्दांकन- चैताली गुरव