आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि तेलगूतील अभिनेते, आमदार एन. बालकृष्ण हे एका सार्वजनिक कार्यक्रमात उधळलेल्या मुक्ताफळांमुळे अडचणीत सापडले आहेत. ऐन महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बालकृष्ण यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
तेलगू चित्रपट ‘सावित्री’च्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यामध्ये बालकृष्ण यांनी आक्षेपार्ह विधाने केली. ते म्हणाले, चित्रपटात मी एखाद्या महिलेचा नुसता पाठलाग केला, तर माझ्या चाहत्यांना ते चालत नाही. चाहत्यांची अशी अपेक्षा असते की मी त्या अभिनेत्रीचे चुंबन घ्यावे किंवा तिला गर्भवती करावे. चित्रपटामध्ये मी असे करत नाही, तोपर्यंत चाहत्यांचे मन तृप्तच होत नाही.
महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपावरून बालकृष्ण यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात आम्ही कायदेशीर तरतुदींचा सल्ला मागितला आहे, असे सरूरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. लिंगैया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. या प्रकरणात बालकृष्ण आणि चंद्राबाबू नायडू यांनी माफी मागावी, अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.