‘लोकसत्ता ऑनलाईन ‘चॅटरुम’ उपक्रम

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या असंख्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लोकसत्ता’ने नेहमीच नवमाध्यमांना आपलेसे केले आहे. ‘लोकसत्ता’ ऑनलाइनच्या ‘चॅटरूम’ उपक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच सहभागी झाली होती. लाइव्ह चॅटला उत्साहाने सुरुवात करताना अमृताने ‘मी सध्या मॅड आहे’ असे सांगितले.  ‘नच बलिये’ची स्पर्धक ते ‘२ मॅड’ या रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक हा प्रवासही अमृताने उलगडला.

लाइव्ह चॅटमध्ये कोल्हापूर ते विदेशातील चाहत्यांनी अमृताला थेट प्रश्न विचारले. चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज मी या स्थानापर्यंत येऊन पोहोचल्याचे सांगत सर्व चाहत्यांचे आभार मानले. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटानंतर आता चांगले चित्रपट व भूमिका स्वीकारण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही अमृता म्हणाली. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अंगप्रदर्शन करण्याची चढाओढ लागली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘‘मराठी चित्रपटाला जागतिक चित्रपटापासून वेगळे करूनका. मराठी चित्रपट ‘ग्लोबल’ झाला आहे हे खरे, पण मग त्याकडे ‘ग्लोबल’ चित्रपटाप्रमाणे का पाहिले जात नाही?’’ असा सवालही तिने केला. ‘‘मराठी चित्रपट ग्लोबल व्हायचा असेल तर त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. अंगप्रदर्शनाचे म्हणाल तर पाश्चिमात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्या गोष्टी तुम्हाला चालतात; पण त्या मराठी चित्रपटात आल्या की त्याचा का त्रास होतो?’’ असा प्रश्नही अमृताने उपस्थित केला.

मराठी चित्रपटसृष्टीतील आवडता कलाकार कोण, या प्रश्नावर अमृताने लगेचच अभिनेता अंकुश चौधरी असे उत्तर देत तो चांगला मित्र असण्याबरोबरच उत्तम अभिनेताही असल्याचे स्पष्ट केले. हिंदी दूरचित्रवाहिन्यांच्या विश्वातही अमृता खानविलकरच्या नावाला चांगली प्रसिद्धी आहे. अमृता सध्या तिच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. सतीश राजवाडे दिग्दíशत ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटामध्ये अमृता आणि अंकुश चौधरीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच अमृता लवकरच एका ‘वेब सीरिज’च्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गप्पांच्या ओघात अमृताने अ‍ॅनिमेटेड चित्रपटांबाबत असलेले तिचे प्रेम, प्रियांका चोप्रासाठी असणारी तिची ‘फॅनगिरी’ आणि रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर या कलाकाराविषयीचे प्रेमही व्यक्त केले.

विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देताना अमृताने वाचकांची किंवा चाहत्यांची निराशा केली नाही. उलट विविध विषयांवर ठाम मत मांडत आपली स्वत:ची भूमिकाही स्पष्ट केली.

‘पालकांनी मुलांना आवड असेल तरच त्यांना ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये जरूर पाठवले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये. पूर्ण विचार करूनच मुलामुलींना या शोमध्ये पाठवा आणि त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होऊ द्या.’ 

-अमृता खानविलकर

अमृता खानविलकरच्या या गप्पा व ‘लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅट’चा संपूर्ण व्हिडीओ facebook.com/LoksattaLive  येथे पाहता येईल.