आपल्या आडमुठ्या आणि वादग्रस्त तत्वांसाठी कायम चर्चेत राहिलेले केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या उचलबांगडीनंतर अनेकांना दिलासा मिळाला. त्यांच्या जागी प्रसून जोशी यांच्या नियुक्तीचं सर्वांनी स्वागतदेखील केलं. निहलानी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये बरेच खुलासे केले. नुकतंच युट्यूब चॅनेल ‘लेहरे टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘इंदू सरकार’ चित्रपटाबाबत गौप्यस्फोट केलाय.

आपलं अध्यक्षपद जाण्यामागे राज्यवर्धन सिंग राठोड, अनुराग कश्यप आणि एकता कपूर यांना त्यांनी जबाबदार मानलं होतं. यामध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी. या मुलाखतीत निहलानी म्हणाले की, ‘स्मृती इराणींनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कामकाज स्विकारलं तेव्हा ‘इंदू सरकार’ चित्रपटावरून वाद सुरू होता. स्मृती इराणींना त्यांचं वर्चस्व दाखवायचं होतं आणि माध्यमांमध्ये मी वादग्रस्त ठरल्यामुळे माझं पद काढून घेण्यासाठी फार वेळ लागला नाही. मी ‘इंदू सरकार’ कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित होऊ देत नव्हतो म्हणून त्यांच्या निशाण्यावर होतो. याच कारणामुळे माझी उचलबांगडी करण्यात आली.’

या मुलाखतीत निहलानी यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. ‘उडता पंजाब’ चित्रपटाला मान्यता देऊ नका असं मला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून सांगण्यात आलं होतं, हे त्यांनी स्पष्ट केलं. ‘चित्रपटाला मान्यता न देण्यासाठी अनेकांकडून माझ्यावर दबाव होता. मीसुद्धा या इंडस्ट्रीमधला आहे. मला जे योग्य वाटलं आणि नियमांनुसार मी आवश्यक ते कट सांगितले आणि चित्रपटाला मान्यता दिली. इतकंच नव्हे तर ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठीही माझ्यावर दबाव होता. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ नये यासाठी मला गृह खात्याकडून पत्र मिळालं होतं. मात्र चित्रपटाच्या कथेविषयी मला माहिती असल्याने, प्रसारमाध्यमं आणि सरकारमध्ये त्याविषयी काही गैरसमज असल्याने मी पुढाकार घेतला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान नेहमीच माझ्याविरोधात होता. माझ्याविरोधात त्यांनी अनेक वक्तव्ये केली,’ असं निहलानी म्हणाले. याशिवाय केंद्रीय माहिती व प्रसारण खात्यातील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी उघडपणे वाच्यता केली. २५ हजार रुपये देऊन एका दिवसात प्रोमोला मान्यता मिळवून घेतली जाते असं त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सॉर बोर्डमधील निहलानींचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त ठरला. कार्यकाळ संपण्याच्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. प्रसून जोशी यांच्या नियुक्तीबाबत निहलानी यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘तो एक चांगला माणूस आहे. मी जे काही पाप किंवा पुण्य केले, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत.’