रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तात्काळ पाठवलेल्या मदतीमुळे अभिनेता आशुतोष राणा याच्या बहिणीला वैद्यकीय उपचार मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना उद्देशून केलेल्या ट्विटमुळे अवघ्या १५ मिनिटांत वैद्यकीय उपचार मिळाल्याचे कळते.

बॉलीवूड अभिनेते आशुतोष राणा यांची बहिण आणि रेणुका शहाणेंची नणंद कामिनी गुप्ता (वय ६३) या शनिवारी ‘सुविधा एक्स्प्रेस’ने मुंबईला येत होत्या. एकट्याच प्रवास करत असलेल्या कामिनी यांच्या अचानक छातीत दुखू लागले. रेणुका यांनी याची माहिती लगेचच सुरेश प्रभू यांना ट्विटरवरून दिली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच डॉक्टरांचे एक पथक कामिनी यांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी ट्रेनमध्ये पोहचले. याविषयी रेणुका यांनी मुंबई मिररला सांगितले की, माझी नणंद दिल्ली ते मुंबई एकटीच प्रवास करत होती. त्यावेळी, साडेसातच्या दरम्यान तिने आपली तब्येत ठीक नसल्याचे आम्हाल फोन करुन सांगितले. आम्ही त्यांना घाबरु नका असे सांगित तेथील एखाद्या रेल्वे कर्मचा-यास कळवण्यास सांगितले. त्या दरम्यान, मी सुरेश प्रभू यांना ट्विट करून याची माहिती दिली. ट्रेन कोटा स्टेशनला पोहचणार होती. अवघ्या एका मिनिटानंतरच मला रेल्वे कर्मचा-यांनी फोन करून नणंदेचा रेल्वे कम्पार्टमेंट आणि सीट क्रमांक याची माहिती घेतली. रेल्वेकडून प्रवाशांना मिळणा-या या तात्काळ प्रतिसादामुळे मी भारावून गेले आहे.