रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात अभिनेत्री कंगना रणौतने हृतिक रोशनसंदर्भात केलेले खुलासे सर्वांनाच थक्क करणारे होते. कंगनाच्या आरोपांमुळे हृतिकच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या आरोपांनंतर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. सुझान आणि लेखक अपूर्व आसरानीनंतर आता गायिका सोना मोहपात्रानेही कंगनावर टीका केलीये. चित्रपट प्रदर्शनापूर्वी प्रमोशनचाच एक भाग म्हणून कंगनाने तिचे वैयक्तिक वाद सर्वांसमोर मांडल्याचा आरोप सोनाने केलाय.
कंगना आणि हृतिकमध्ये तेढ का निर्माण झाली, हृतिकसोबतचं तिचं नेमकं नातं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं कंगनाने या मुलाखतीत बेधडकपणे दिली. ही उत्तर देताना तिने हृतिकवर अनेक आरोपही केले. गायिका सोना मोहपात्राने या सर्व गोष्टींना ‘सर्कस’ असं म्हटलंय. ‘तिने यापूर्वी दिलेल्या निर्भीड मुलाखती आणि लिहिलेली खुली पत्रं यापेक्षा फार बरी होती,’ असंही तिने म्हटलंय. फेसबुकवर सोनाने कंगनासाठी एक भलीमोठी पोस्टच लिहिली आहे.
वाचा : मराठी कलाकारांमध्ये ‘फ’च्या बाराखडीची क्रेझ
या पोस्टमध्ये ती म्हणते की, ‘स्त्रीवादी विचारांचा पुरस्कार करणारे पुरुषही आपल्या समाजात आहेत. तुझ्या आणि माझ्यासारख्या मेहनती, बेधडक महिलांचं ते समर्थनदेखील करतात. आपल्याला जरी त्यांची गरज नसली तरी त्यांना विसरुनही चालणार नाही.’
वाचा : ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्याचे ऐकून सुनील पालला अश्रू अनावर
कंगनाच्या वक्तव्यांवर सोशल मीडियावर नेटीझन्सकडून विविध मतं मांडली गेली. कंगनाप्रमाणेच सोनासुद्धा स्त्रीवादी विचारांचा पुरस्कार करणारी, परखड मतं ठेवणारी आहे. त्यामुळे कंगनाविषयीचं तिचं मत अनेकांनाच आश्चर्यचकीत करत आहे.