तीन वेगवेगळ्या जॉनरचे तीन चित्रपट एकाच आठवडय़ात पाहायला मिळावेत हा या शुक्रवारचा योग आहे. त्यातून तुमच्या आवडीचा कोणता तो सवडीने पाहा.. गाजलेल्या हॉलीवूडपटांचे सिक्वलपट पुढच्या आठवडय़ापासून रांगेने पाहायला मिळतील. आज मात्र कित्येक दिवसांनी मराठीत चांगला चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘चि. व. चि.सौ.कां.’ हा चिवित्र नावाचा धम्माल कौटुंबिक नाटय़पट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हिंदीतही प्रेक्षकांसमोर दोन पर्याय आहेत. ‘आशिकी’ फेम दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या प्रेमपटांचे चाहते असलेल्यांसाठी चेतन भगत लिखित कादंबरी ‘हाफ गर्लफ्रेंड’वर आधारित त्याच नावाचा त्याचा चित्रपट पाहता येईल. तर हटके चित्रपट पाहणाऱ्यांसाठी इरफान खान आणि सबा करीम जोडीचा ‘हिंदी मीडियम’ हा मनोरंजनाची पर्वणी असेल.

हाफ गर्लफ्रेंड

‘दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम’ असे घोषवाक्य घेऊन आलेला हा चित्रपट काय आहे हे चेतन भगत यांची कादंबरी वाचलेल्यांना सांगणे न लगे. बिहारचा माधव शास्त्री आणि दिल्लीच्या रिया सोमाणीची ही प्रेमकथा आहे. माधवच्या भूमिकेत अर्जुन कपूर आणि रियाच्या भूमिकेत श्रद्धा कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. मोहित सुरीच्या चित्रपटातील गाणी नेहमीच हिट असतात. तशी ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातील गाणीही आधीच हिट झाली आहेत. प्रेमकथेसाठी आवश्यक असलेले सगळे नाटय़ या चित्रपटात भरभरून असल्याने प्रेमीजन खचितच या चित्रपटाची वाट धरतील.

हिंदी मिडीयम

इरफान खानच्या या चित्रपटाच्या प्रोमोजनी सध्या धुमाकू ळ घातला आहे. मुलाचा दाखला चांगल्या शाळेत व्हावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. तशीच ती या चित्रपटातील पालकांचीही आहे ज्यांच्या भूमिको इरफान खान आणि सबा करीम यांनी केल्या आहेत. इंग्रजी शाळेत दाखला घ्यायचा तर मुलाखत नामक भयंकर प्रकाराला पाल्य आणि पालक या दोघांनाही सामोरे जावे लागते. मुलाला हाय-फाय इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी ही जोडी जे जे प्रयत्न करते त्याची कथा ‘हिंदी मीडियम’ या साकेत चौधरी दिग्दर्शित चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नेहमीच्या मसालापटांपेक्षा ‘हिंदी मीडियम’ वेगळा आहे यात शंका नाही.

चि. व. चि. सौ. कां.

‘एलिझाबेथ एकादशी’नंतर दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि ‘झी स्टुडिओ’ हे त्रिकूट ‘चि. व चि.सौ.कां.’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. आत्ताच्या काळातही जेव्हा एखादी मुलगी लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर मला त्या मुलाबरोबर राहून बघायचे आहे, असे म्हणते तेव्हा दोन्हीकडे खासक रून तिच्या घरात एकच हाहाकोर उडतो. तरीही सौर प्रकल्पावर काम करणारा संशोधक चिरंजीव आणि प्राणिमात्रांवर प्रेम करणारी डॉक्टर चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी जेव्हा श्री. आणि सौ. होण्याच्या तयारीसाठी एकत्र येतात तेव्हा काय गंमतजंमत होते ते खुसखुशीतपणे सांगणारा असा हा चित्रपट आहे. ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोलेसह ज्योती सुभाष, सतीश आळेकरांसारखी ज्येष्ठ  कलाकारांचीही मोठी फौज या चित्रपटात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉक्स ऑफिस

  • बाहुबली २ (हिंदी) – ४०० कोटी
  • सरकार ३ – ७.५ कोटी
  • मेरी प्यारी बिंदू – ७.२५ कोटी ’ नूर – ६.६ कोटी
  • फास्ट अँड फ्युरिअस ८ – ८९.९७ कोटी