‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे ही बाब आता सर्वांनाच ठाऊक झालीये. सध्या ती ‘यूनिसेफ’ची सदिच्छादूत म्हणून ‘जॉर्डन कंट्री ऑफिस’मध्ये काही मुलांची भेट घेतेय. सीरिया हल्ल्यातील निर्वासितांच्या तळांना भेट देत, प्रियांका त्यांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण देऊ पाहतेय. प्रियांकाने या दौऱ्यात तिच्या चिमुरड्या फॅन्सची मनं जिंकली आहेत. त्यासोबतच ती त्यांना बॉलिवूडशीही जोडू पाहतेय. बॉलिवूड चित्रपटांमुळे त्या निर्वासितांच्या आयुष्यातही कशा प्रकारे काही मजेशीर आणि आनंददायी क्षणांचा शिडकावा होतोय हे तिने एका व्हिडिओतून सर्वांसमोर सादर केलंय.

सीरिया हल्ल्यातून बचावलेल्या या मुलांमध्येही बॉलिवूड कलाकारांविषयी बरंच वेड आहे. विश्वास बसत नसेल तर प्रियांकाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओतून याचा प्रत्यय येतोय. मुख्य म्हणजे सलमान, शाहरुख आणि इतर बॉलिवूड कलाकारांच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या असणाऱ्या या व्हिडिओमध्ये कतरिना कैफसाठी एक सरप्राईज आहे. कारण, वफा नावाची तिची एक चाहती मोठ्या उत्साहात आपल्या या आवडत्या अभिनेत्रीचं कौतुक करताना दिसतेय.

या व्हिडिओमध्ये वफा म्हणतेय, ‘मला कतरिना कैफ खूप आवडते. तिच्या असंख्य चाहत्यांपैकीच मीसुद्धा एक आहे. मी तिचे जवळपास सर्वच चित्रपट पाहिले आहेत. तिचा कोणता चित्रपट मी पाहिला नाहीये असं नाही. तिचा एकच चित्रपट टीव्हीवर जर पुन्हा पुन्हा लागला तरीही मी तो पाहते. कतरिना माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे…’ आपल्या आवडत्या अभिनेत्रीविषयी बोलताना वफाच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहण्याजोगा आहे. एका कलाकारासाठी दूरच्या देशातील चाहत्यांनी इतकी भावनिक प्रतिक्रिया देणं ही बाब फारच महत्त्वाची असते. कतरिनाशिवाय तेथील मुलांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करिना कपूर, अनुष्का शर्मा या कलाकारांविषयीसुद्धा बरंच वेड असल्याचं स्पष्ट होतंय.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

सातासमुद्रापार बॉलिवूडला मिळणाऱ्या लोकप्रियतेचा मुद्दा अधोरेखित करत प्रियांकाने लिहिलंय, ‘ही पोस्ट मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठीच आहे. कधीकधी मनोरंजनाव्यतीरिक्तही काही गोष्टींचा परिणाम इतका दूरगामी असतो की ज्याचा विचारही आपण कधी करु शकत नाही.’ हे कॅप्शन देत तिने #ProudofmyJob #MissionForChildren #Children Uprooted #ChildrenOfSyria #PCInJordan असे हॅशटॅग देत आपण करत असलेल्या कामाप्रती अभिमान व्यक्त केला आहे.